नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाची ऐतिहासिक घटना घडवली. त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांनाही धम्ममार्गावर आणले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२५ मध्ये हा दिवस अधिक खास असून, देशभरातून लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दाखल होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रचंड वाढणाऱ्या गर्दीचा विचार करता, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांमुळे विविध राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना नागपूरपर्यंत प्रवास सोयीस्कर होणार आहे. महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांतील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरून या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
मुंबई – नागपूर विशेष गाड्या
नागपूर– सीएसएमटी विशेष गाडी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
सीएसएमटी–नागपूर विशेष गाडी १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरमध्ये पोहोचेल.
या गाड्यांना अजनी, वर्धा, बदनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण या स्थानकांवर थांबे असतील.
पुणे, सोलापूर मार्गांवर विशेष गाड्या
नागपूर–पुणे विशेष गाडी २ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.२० वाजता पुण्यात पोहोचेल.
पुणे–नागपूर विशेष गाडी १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.५० वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
या मार्गावरील थांबे: अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड.
नागपूर – सोलापूर विशेष गाडी २ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता सुटेल.
सोलापूर – नागपूर विशेष गाडी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.५० वाजता सुटेल.
इतर महत्त्वाच्या गाड्या
याशिवाय नाशिक, भुसावळ, अकोला, नांदेड, बिदर या मार्गांवरही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चंद्रपूर, बल्लारपूर, नांदेड, सिरपूर कागजनगर यांसारख्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
माहिती व तिकीट आरक्षण
प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा आणि आपली तिकिटे लवकरात लवकर आरक्षित करावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. अधिकृत वेळापत्रक, गाडी क्रमांक आणि तिकिट आरक्षणाची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लाखो अनुयायांची वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेचे हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आणि गरजेचे ठरणार आहे.