औरंगाबाद नागपूर महामार्गावर किन्हीराजा परिसरात धूम स्टाईलने चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चालत्या ट्रकचे मागच्या बाजूचे कुलूप तोडून ट्रकमधील पार्सलचा माल चोरण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.
हेही वाचा- नागपूर: जिल्ह्यातील १० टक्के मार्गांवर ८५ टक्के अपघात
मूंबई येथून एमएच १३ एएक्स ८११९ या पॅक बाॅडीच्या ट्रकमध्ये पार्सलचा माल नागपूरकडे जात होता. मंगळवार १३ डिसेंबरच्या सकाळी ४ वाजता जऊळका येथील रेल्वे पटरी ओलांडताच ट्रकच्या मागील बाजूचे कुलूप तोडून धावत्या ट्रकमध्ये चोरटे शिरल्याचा अंदाज ट्रक चालकाला आला. संबंधित ट्रक हा किन्हीराजा बसस्थानकाजवळ येताच ट्रकचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे चालत्या ट्रकमधून उड्या मारून पल्सर गाडीवर बसून पळून गेले. या घटनेची माहिती चालकाने पोलिसांना दिली आहे. धावत्या ट्रकमधून चोरीचा प्रयत्न झाल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.