नागपूर : हवामानातील बदलामुळे निसर्गाचे चक्र बिघडले असून त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहे. २०३० पर्यंत हे परिणाम तीव्र होणार असून येत्या आठ वर्षांत दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी गेल्या महिन्यातील त्यांच्या अहवालात दिला आहे. ‘युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन’ (यूएनडीआरआर) यांनी हा अहवाल तयार केला आहे. २०१५ पासून दरवर्षी ४०० च्या जवळपास नैसर्गिक संकटांचा सामना जगभरातील नागरिकांना करावा लागत आहे. मात्र, हवामानातील बदलाचा वेग असाच कायम राहिल्यास नैसर्गिक संकटांची संख्या वेगाने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. येत्या आठ वर्षांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तिपटीने वाढण्याचा इशारा यात दिला आहे. या वर्षीपासूनच त्याचा अनुभव येऊ लागला आहे. साधारणत: एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ापासून सुरुवात होऊन मे महिन्यात दोन ते तीन उष्णतेच्या लाटा येतात. या वर्षी मात्र मार्च अखेरपासूनच तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली. मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांतच उष्णतेच्या तीन लाटा येऊन गेल्या. त्यामुळे या अहवालातील इशारा खरा होताना दिसू लागला आहे. दुष्काळाचे प्रमाणही ३० टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीची झळ पोहोचणार आहे. हवामान बदलाच्या या वेगाचा परिणाम लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीवरदेखील होणार असल्याचे या अहवालात नमूद आहे.

सुमारे १७० अब्ज डॉलरचे नुकसान

नैसर्गिक संकटांमुळे १९९० च्या दशकात जगाला ७० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. आता हे प्रमाण १७० अब्ज डॉलपर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळेच नैसर्गिक संकटच नाही तर करोनासारखी महामारी, आर्थिक संकटे व खाद्यान्नाची टंचाई यातही वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

‘गंभीर दखल घ्यावी लागेल’

हवामान बदलांमुळे होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल घ्यावी  लागेल. या बदलाला मनुष्य कारणीभूत आहे आणि त्यालाच नैसर्गिक संकटाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अन्यथा, भविष्यात त्याचे अतिशय गंभीर परिणाम दिसून येतील, असे ‘युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन’च्या प्रमुख (यूएनडीआरआर) मामी मिजुटोरी यांनी या अहवालात म्हटले आहे.