नागपूर : पश्चिम आणि पूर्व असे विदर्भाचे दोन महसुली विभाग आहेत, दोनी विभागातील राजकारण वेगळे आहे. त्यावर प्रभाव टाकणारे नेतेही वेगवेगळे आहेत. सत्तेत असलेला पक्ष लाभाचे पद वाटप करतानाही पूर्व आणि पश्चिम विदर्भ असा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. पश्चिम विदर्भातील नेत्याला पूर्व विदर्भातील संस्थावर नियुक्ती दिली जात नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने याला छेद देण्याचे ठरवलेले दिसते. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी या पक्षाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची शिफारस केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे झाल्यास पक्षाच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडू शकतो. ही फक्त चर्चाच आहे, पण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध करणे सुरू केले आहे.
नागपूर शहराच्या विकासासाठी दोन विकास यंत्रणा आहे, एक महापालिका व दुसरी नागपूर सुधार प्रन्यास. सुधार प्रन्यासचे कामकाज विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून चालते. त्याचे अध्यक्ष प्रन्यासचे सभापती अर्थात आयएएस अधिकारी असतो तर अन्य विश्वस्तांमध्ये शहरातील आमदारांचा प्रतिनिधी, महापालिकैतील लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी असे एकूण दहा विश्वस्त असतात. काही अशासकीय सदस्य असतात त्यांची नियुक्ती राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाते.
या नियुक्त्या राजकीय असतात. सत्ताधारी पक्ष त्यांच्या नेत्यांना या मंडळावर संधी देत असते. सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट हा त्यातील घटक पक्ष आहे. या तीनही पक्षात लाभाचे पद वाटणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नासुप्रचे एक विश्वस्तपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना पक्ष संधी देईल अशी अपेक्षा होती. नागपुरात अजित पवार गटाचे प्राबल्य नाही, एकहीआमदार सुद्धा नाही.
एक माजी नगरसेवक सुद्धा नाही. त्यामुळे विस्वस्तपद द्यायचे कोणाला असा प्रश्न पक्षापुढे निर्माण झाला. त्यातून अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचे नाव पुढे आले व त्यांच्या नावाची शिफारस विश्वस्तपदासाठी करण्यात आल्याची चर्चा राष्ट्रवादीच्याच या पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी सुरू केली. बाहेरच्या म्हणजे अमरावतीच्या लोकप्रतिनिधीला नागपूरच्या माथी मारू नये, अशा तक्रारी करणे सुरू झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप खोडके यांची अधिकृत नियुक्ती जाहीर झाली नाही, पण ती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंतोष भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
