पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तर दुसरीकडे त्यांची पत्नी सोनाली चव्हाण यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाठार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>अमरावती: कॉलेजला दांडी अन ‘ती’ प्रियकरासोबत चहाच्या टपरीवर…
हिंगणघाट शहर ठाणेदार असताना चव्हाण यांच्याकडे एका युवतीने तक्रार केली होती. या प्रकरणात न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने चव्हाण यांनी सदर युवतीस जाळ्यात ओढले. त्यानंतर सातत्याने शारीरिक शोषण केले. युवतीने तक्रार दाखल केली. अखेर वरिष्ठांनी सहा मार्चला चव्हाणविरोधात गुन्हे दाखल केले. त्यात जामीन मिळविण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. पती असा कात्रीत सापडला असतानाच आता पत्नी सोनाली चव्हाण यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्यातील सोनके येथील शेती सहकारी पतसंस्थेचे हे प्रकरण आहे. संस्थेच्या संचालकांनी नातेवाईकांच्या नावाने बोगस कर्जवाटप केल्याचा आरोप आहे. यात बारा कोटी अंशी लाख रुपयाचा अपहार झाल्याची तक्रार झाल्याने सर्व एकवीस संचालकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी एक संचालक सोनाली चव्हाण आहेत. कागदपत्रांची हेरफेर केल्याचाही आरोप आहे. चव्हाण पती-पत्नी आता आरोपी झाल्याने येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. वाठार पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.