नागपूर : केंद्र सरकारने अलीकडेच वाहनांवरील वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) मोठी कपात केली आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीच्या काळात वाहन विक्रीत मोठी उसळी बघायला मिळत आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशीही सकाळपासून दुचाकी व चारचाकी वाहन घरी नेण्यासाठी ग्राहकांनी शहरातील विविध शोरूममध्ये गर्दी केली. मागील वर्षीच्या तुलनेत दुचाकीमध्ये सुमारे २० टक्के अधिक विक्री झाल्याचे निरीक्षण वाहन विक्रेत्यांकडून नोंदवले गेले.
शहरातील प्रमुख वाहन डीलरशिप आणि शोरूममध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी वाहन घरी नेण्यासाठी होती. या वाहनांची नोंदणी ग्राहकांकडून काही दिवसांपूर्वीपासूनच केली गेली होती. यंदा वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल बघता धनत्रयोदशीला ग्राहकांकडून पारंपरिक सुवर्णखरेदीसोबतच नवीन गाड्यांमध्ये गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य दिलेले दिसत आहे.
जीएसटी कपातीनंतर दुचाकी वाहनांचे दर १० ते १३ हजार रुपयांपर्यंत कमी झाल्याची माहिती खूद्द शोरूम चालक देत आहे. त्यामुळे दर कमी झाल्याने ग्राहकांकडून दुचाकी वाहनांची जोरात खरेदी केली जात आहे.
दरम्यान काही ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहर्तावर वाहनाची नोंदणीसह अग्रीम रक्कम भरत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती घेऊन जाणार असल्याचेही शोरूम चालकांना कळवले आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही शहरातील वाहन विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसण्याचा अंदाजही शोरूम चालकांकडून व्यक्त केला गेला.
वाहन विक्रेत्यांचे म्हणणे काय?
जीएसटी करात कपातीनंतर बऱ्याच चारचाकी वाहनांतही ५०,००० ते १.५ लाख रुपयांपर्यंतची किंमत घसरण झाल्याने ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मते, मागील काही महिन्यांपासून आर्थिक मंदी आणि वाढत्या कर्जदरांमुळे वाहनांची विक्री थोडी मंदावली होती. मात्र, करकपातीनंतर वाहनांचे किफायतशीर दर आणि सणासुदीतील ऑफर्स यांच्या संयोगामुळे बाजारात नवचैतन्य आले आहे.
यंदा आम्ही गेल्या वर्षाच्या तुलनेत १८ ते २० टक्के अधिक गाड्या विकल्या. शहरातील यामाहा, होंडा, हिरो, मारुती, टाटा, आणि ह्युंदाई या कंपन्यांच्या शोरूममध्ये दिवसभर उत्सवी वातावरण होते. अनेक ग्राहकांनी नवीन वाहनांची पूजा करून ते घराकडे नेले. शहरातील वाहन नोंदणी कार्यालयातही दिवसभर गजबजलेले दृश्य दिसले.
सुमारे दीडशे कोटींचा व्यवसाय
नागपूर जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री मिळून धनत्रयोदशीच्या मुहर्तावर सुमारे दीडशे कोटींचा व्यवसाय होण्याचा वाहन विक्रेत्यांचा अंदाज आहे. त्यातही यंदा बॅटरीवर आधारित ई वाहनांसह पेट्रोलवर आधारित वाहनेही मोठ्या प्रमाणात विकली गेली. त्यामुळे ग्राहकांचा कल पर्यावहन पुरक ई वाहनांसह पेट्रोल वाहनांकडेही असल्याचे चित्र होते.