चंद्रपूर : फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे. सात वर्षापूर्वी ७ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनातच ही मागणी लावून धरण्यात आली होती असा दावा भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा दावा करतांना डॉ.जीवतोडे यांनी भाजप नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याचे श्रेय घेवू नये असाच संदेश दिला आहे.

येथे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्ट २०१८ ला वरळी मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनामध्ये फुले दांपत्याला भारतरत्न द्यावे ही मागणी होती. त्यावेळेस सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीसह उद्घाटक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस होते तसेच स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्षस्थानी डॉ. अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजुरकर उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापण्यापासून ही मागणी करीत आला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही केंद्राच्या अधिवेशनात लोकसभेमध्ये ही मागणी लावून धरली होती. यानुसार राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थापनेपासून झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक ओबीसी अधिवेशनात फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसह फुले दाम्पत्यांचे समग्र वाड्मय दहा रुपयात उपलब्ध करून द्यावे, ही मागणी देखील ठेवली होती. याबाबत राज्य व केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा देखील करण्यात आला होता. त्या सर्व जाणीव जागृतीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी मिळून या मागणीला पाठिंबा दिला व तसा ठराव मांडला, हे समस्त ओबीसी समाजाकरीता आनंदाची बाब आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर ठराव मांडलेल्या सर्वपक्षीय आमदारांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही स्वागत तथा अभिनंदन करतो, तथा लवकरात लवकर सर्व पक्षीय आमदारांनी एकमताने पारीत करुन केंद्राकडे सदर मागणीची शिफारस करुन तात्काळ फुले दाम्पत्यांना भारतरत्न द्यावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी करतांना डॉ.जीवतोडे यांनी विधीमंडळात यासंदर्भात ठराव पारित करावा, तसेच शंभर आमदारांची स्वाक्षरी घेणारे भाजपचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. तसेच मुनगंटीवार यांनी याचे श्रेय घेवू नये असाही संदेश या पत्रकातून दिला आहे.