सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : घरी हलाखीची परिस्थिती, दोनवेळच्या अन्नासाठी मोठा संघर्ष वाट्याला येऊन देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण घेत थेट अमेरिकेत वैज्ञानिकपदी निवड झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडी गावातील रहिवासी डॉ. भास्कर हलामी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

हेही वाचा >>>अकोल्यात राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी सोलापूरचे कार्यकर्ते; २०० वाहने व सहा हजार यात्रेकरू दाखल

‘लोकसत्ता’ने भास्कर यांच्या गावी भेट देऊन त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतला. कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी या छोट्याशा गावी एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले भास्कर हलामी आज अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. या प्रवासाबद्दल ते संगातात, घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणेसुद्धा कठीण होते. मात्र, जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्या वडिलांना मी उच्च शिक्षण घ्यावे, असे नेहमीच वाटायचे. म्हणून त्यांनी एकवेळ पोटाला मारून मला शिकवले. वडिलांना कसनसूर येथील आश्रमशाळेत कामठी म्हणून नोकरी लागली. त्याठिकाणीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे ते सांगतात. त्यानंतर यवतमाळ येथील केळापूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे बीएड केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काही काळ नोकरीदेखील केली. अशातच नागपुरातील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून रूजू झाले. काही वर्षे येथे घालावल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या माध्यमातून त्यांनी मिशिगन विद्यापीठातून पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नोकरी लागली. दरम्यान, त्यांना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. आज ते पत्नी व दोन मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहे. महिनाभरासाठी ते आपल्या गावी चिरचाडी येथे आले आहेत. आई-वडिलांच्या इच्छाशक्तीनेच मी आज घडलो असे ते आवर्जून सांगतात.

हेही वाचा >>>प्रेयसीच्या बहिणीवर ९ महिन्यांपासून अत्याचार; अश्लील छायाचित्र व चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

समाजातील मुलांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे
देश आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. तरीही आदिवासी समाजात पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाचे महत्त्व दिसून येत नाही. यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्थिती कारणीभूत असली तरी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावे. यासाठी भास्कर आग्रही आहेत. म्हणून ते शक्य ती मदत करण्यास तत्पर असतात. त्यांनी महिनाभराच्या काळात गावात ग्रंथालय सुरू केले. रोज त्याठिकाणी मुलांना मार्गदर्शन करतात. पुढेही समाजातील मुलांना शिक्षणासाठी शक्य ती मदत करण्यास आपण तयार असल्याचे ते सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr bhaskar halami from the tribal community has been selected as a scientist in america amy
First published on: 17-11-2022 at 14:57 IST