अकोला (पातूर) : अकोला जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोलापूरहून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. पश्चिम विदर्भात राहुल गांधी यांची पदयात्रा दाखल झाल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळण्यासाठी थेट पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून ६ हजार कार्यकर्ते पातूर येथे दाखल झाले आहेत. २०० विविध वाहनांचा ताफा सोलापूरवरून गेल्या दोन दिवसांत अकोल्यात दाखल झाला आहे. अकोला जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची इतर जिल्ह्यातून जमवाजमव केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा वाशीम जिल्ह्यातून बुधवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे दाखल झाली. रात्रीच्या मुक्कामानंतर यात्रेच्या राज्यातील ११ व्या दिवशी पातूर येथून आज राहुल गांधींनी पदयात्रेला प्रारंभ केला. यात्रेनिमित्त पातूरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा: नागपूर: प्राध्यापकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी धवनकरांनी दाखवले व्याजाने पैसे देण्याचे आमिष

दरम्यान, या पदयात्रेची अकोला जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरच्या आ. प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात जनजागृती करून यात्रेला प्रतिसाद मिळण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. अकोला जिल्ह्यात रसातळाला गेलेली काँग्रेस व गटातटात विभागलेल्या नेत्यांमुळे यात्रेला फटका बसण्याचा अंदाज प्रदेश नेत्यांना आला. त्यामुळे यात्रेची जबाबदारी असलेल्या आ. प्रणिती शिंदे यांनी थेट सोलापूरवरून आपले सुमारे सहा हजार कार्यकर्ते अकोला जिल्ह्यात आणले आहेत. विविध प्रकारच्या २०० वाहनातून हे कार्यकर्ते अकोला जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यातील रस्त्यांवर सर्वत्र सोलापूरच्या वाहनांचीच गर्दी दिसून आली. अकोला जिल्ह्यातील राहुल गांधींच्या पदयात्रेत सोलापूरचे वर्चस्व दिसून येत आहे. यानिमित्ताने अकोला जिल्हा काँग्रेसची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur activists for rahul gandhi bharat jodo yatra in akola six thousand pilgrims entered akola tmb 01
First published on: 17-11-2022 at 12:50 IST