लोकसत्ता टीम

यवतमाळ: नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा येथील टोल नाक्यावर एका टेम्पो चालकाने टोल वाचविण्यासाठी केलेल्या कृत्याने तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला. या घटनेने टोल नाक्यावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून टोल नाका आहे. या टोलनाक्यावर मालवाहू वाहनांकडून टोल वसूल केला जातो. येथे टोल वसुलीची स्वयंचलित यंत्रणा नसल्याने बॅरिकेट्स लावून गाड्या थांबविल्या जातात व टोल घेतला जातो. दोन दिवसांपूर्वी एका मालवाहू टेम्पो चालकाने टोल वाचवण्यासाठी आपले वाहन भरधाव चालवून येथील बॅरिकेट्स उडवून दिले. या घटनेत जीव वाचविण्यासाठी बाजूला पळालेला एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या फुटेजचा आधार घेऊन त्या वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा- ‘आनंदाचा शिधा’वर संपाचे विरजण! शिधावाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पांढरकवडा येथील या टोलनाक्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. मुदत संपूनही हा टोल नाका कायम असल्याची चर्चा पांढरकवडा येथे आहे. मात्र टोलनाक्यावरील कर्मचारी येथे टोल अधिकृतपणेच घेतला जात असल्याचे सांगतात. यवतमाळ जिल्ह्याबाहेरील नोंदणी असलेल्या वाहनांकडून येथे जबरदस्तीने टोल वसूल केल्या जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे चिडलेल्या एका वाहनधारकाने हा प्रकार केला असावा, अशी चर्चा पांढरकवड्यात आहे. राजकीय वरदहस्ताने वर्षानुवर्षे हा टोल नाका सुरू असल्याचे सांगितले जाते.