RSS Centenary Celebration: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी विजयादशमी सोहळ्यात यंदा एक ऐतिहासिक आणि आधुनिक टप्पा पहायला मिळाला. पारंपरिक शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले गेलेले ड्रोन आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पिनाका अग्निबाण या शस्त्रांचे पूजन करण्यात आले. नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पार पडलेल्या या सोहळ्याने पारंपरिकता आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण सादर केले.

परंपरेनुसार, विजयादशमीच्या दिवशी संघाच्या मुख्य कार्यक्रमात तलवार, ढाल, भाले, धनुष्यबाण यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे पूजन होते. मात्र यंदाच्या शताब्दी वर्षात राष्ट्रीय सुरक्षेला समर्पित दृष्टिकोन ठेऊन संघाने आधुनिक युगाशी सुसंगत बदल केला. कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले गेलेले उच्च-तंत्रज्ञान ड्रोन प्रमुख आकर्षण ठरले. तसेच चंद्रपूर आणि अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार झालेले पिनाका हे भारतीय बनावटीचे अग्निबाण देखील शस्त्रपूजनासाठी ठेवण्यात आले होते.

या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, यंदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी परंपरेला थोडा फाटा देत सुरुवातीलाच कोविंद यांना भाषणासाठी आमंत्रित केले. कोविंद यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यातील ऐतिहासिक संबंध उलगडून सांगितले. त्यांनी १९४० मध्ये कराड येथे आंबेडकरांनी संघाच्या शाखेला दिलेली भेट आणि तेथील सकारात्मक अनुभव शेअर केला.

यानंतर मोहन भागवत यांनी ध्वजारोहण व शस्त्रपूजनाचे विधी पार पाडले. आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या सुरक्षेची बदलती गरज, समाजातील समरसता, आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच देश-विदेशातील विशेष निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. शताब्दी वर्ष असल्याने पाहुण्यांसाठी भव्य सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुसंस्कृत समावेशाचे दर्शन घडवले. हे संघाच्या बदलत्या युगातील समरसतेचे आणि सुसंगतीचे प्रतीक मानले जात आहे.