भंडारा : रविवारी गांधी चौकात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचे व्रण ताजे असतानाच भंडाऱ्यात पुन्हा एका हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शहिद भगतसिंग वॉर्ड येथे एका दारुड्या मुलाने स्वतःच्या आईवरच निर्दयीपणे चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज, २ जून रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
मुन्ना मनोहर निनावे, वय ३०, रा. भगतसिंग वॉर्ड असे आरोपी मुलाचे नाव असून तो मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. तर माधुरी निनावे, वय ६० असे आईचे नाव असून सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – चंद्रपूर : २ व ३ जून रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा
प्राप्त माहितीनुसार, शहरातील छोटा बाजार चौकातील शहीद भगतसिंग वॉर्ड येथे माधुरी निनावे ही तिच्या दोन मुलांसोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर माधुरी दारूचे दुकान चालवीत होती. तिचा लहान मुलगा मुन्ना निनावे याला दारूचे व्यसन जडल्याने तो पैशांसाठी रोज आईला त्रास देत असे. त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने रोज दारू पिऊन आईला शिवीगाळ किंवा कधी कधी मारहाणसुद्धा करीत होता.
काल त्याने आईकडे दारूसाठी पैसे मागितले असता तिने नकार दिला. त्यावरून त्याने रात्री आईला शिवीगाळ केली. त्यानंतर पहाटे ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान दारूच्या नशेत मुन्ना चाकू घेऊन घरी आला आणि त्याने त्याच्या आईच्या पोटावर आणि गळ्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. गंभीररित्या जखमी महिलेला नागपूर येथे उपचारकरिता हलविण्यात आले आहे. दरम्यान, मुन्ना याने हत्या केलेला चाकू त्याने जवळच्या नालीत फेकून देत स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आईवर तलवारीने वार केल्याची कबुली दिली.
हेही वाचा – इस्लाम भारतात सुरक्षित, बाहेरचे आक्रमक गेले, आता देशात आहेत ते आपलेच – मोहन भागवत
या प्रकरणाचा तपास भंडाऱ्याचे ठाणेदार सुभाष बारसे करीत आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यात खून, चोरी, सट्टा लावणे, गांजा विक्री अशा घटना वाढतच आहेत. वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे. यासाठी आता पोलीस प्रशासन काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष आहे.