गडचिरोली: मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कामी आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा तीच परिस्थिती असताना धरणाचे पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली – नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. तर अनेक मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पाणी जमा झाल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. मागील वर्षी तर परिस्थिती अतिशय बिकट होती. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने प्रभावित क्षेत्रातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु मध्यप्रदेशातील संजय सरोवर, महाराष्ट्रातील गोसेखुर्द, तोतलाडोह आणि धापेवाडा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गडचिरोलीतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा… संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, चित्रा वाघ यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या धरणांमधून ६.५० लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी थेट वैनगंगेला येत असल्याने गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आरमोरी मार्गावरील पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. धरणातून असाच विसर्ग सुरू राहिल्यास जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन यावर लक्ष ठेऊन आहेत. गरज पडल्यास आपत्ती व्यवस्थापन चमू देखील तयार ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.