यवतमाळ: वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन धारकांचे इ-चलान फाडण्यात आले. मात्र यातील असंख्य वाहन चालकांनी दंडाची रक्कमच भरली नसल्याने वाहतूक शाखेची कारवाई केवळ फार्स ठरत आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एक लाख सहा हजार ७५१ वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम तोडले. त्यांच्याकडे तब्बल साडेचार कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र दंड वसूल न झाल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच वाहतुकीचे नियम तोडणार्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. सहा महिन्यांत ५१ हजार ३०४ वाहन चालकांनी वाहतुकीचे विविध नियम तोडले आहे. त्यांच्याकडून दंडापोटी दोन कोटी आठ लाख ६८ हजार ९५० रुपयांचे इ-चलान फाडण्यात आले. हेही वाचा. सव्वा दोन कोटीची निविदा मर्जीतील कंत्राटदाराला देण्यासाठी नियम पायदळी तुडवले जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्याच्या कालावधीत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्यांची संख्या एक लाख सहा हजार ७५१ इतकी आहे. त्यांच्यावर चार कोटी ५७ लाख १५ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यात मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, सीटबेल्ट न लावणे, काळ्या काचा, नियमबाह्य सायलेन्सर, प्रवेशबंदी असतानाही प्रवेश, विरुद्घ दिशेने वाहन चालविणे आदींचा समावेश आहे. वाहतूक शाखा कारवाई करत असूनही वाहनधारक नियमांचे पालन करत नसल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते. हेही वाचा. चंद्रपूर जिल्ह्यातील पाचही प्रमुख नद्या दहा वर्षांपासून प्रदूषित; कृती आराखडा केवळ कागदावरच वाहतूक नियम तोडल्यास ५०० ते पाच हजार रुपयापर्यंतचा दंड वाहतूक शाखेकडून आकारण्यात येतो. दंडाची ही रक्कम ‘महाट्रॅफीक अॅप’द्वारे ऑनलाइन तसेच स्थानिक वाहतूक शाखेचे अंमलदार यांच्याकडील इ-चलान मशीन, क्यूआर कोड, डेबीट-क्रेडीट कार्डवर रोख रक्कमेद्वारे भरता येते. मात्र, कारवाईनंतरही लाखांवर वाहनधारकांनी दंडाच्या रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे वाहतूक नियम तोडण्यासाठीच असतात, अशा मानसिकतेत वाहनचालक असल्याचे दिसते. वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात येतो. येत्या ९ डिसेंबरला लोकअदालत होत आहे. त्यापूर्वी दंडाच्या रक्कमेचा भरणा न केल्यास वाहन धारकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी स्पष्ट केले.