अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर येथे शुक्रवारी दुपारी १.१५ ते १.२० वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. गावात उपस्थित असलेल्या तलाठी आणि ग्रामसचिवांनी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.दुपारी अचानकपणे परिसरात हादरे जाणवले. काही लोकांच्या घरातील भांडी खाली पडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांना पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे. शिवणगाव फत्तेपूर येथे दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. याआधी सुद्धा परिसराममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर भूकंपाच्या तीव्रतेबाबत कोणताही संदेश प्राप्त झालेला नाही. भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता आणि क्षेत्रीय तपासणी (सर्वेक्षण) करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग, नागपूर येथील पथक घटनास्थळी पाठवण्याबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.

गेल्या ७ सप्टेंबरला तिवसा तालुक्यातीलच शिरजगाव मोझरी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. गावात सकाळी अचानक अनेक घरात पाट्यांवर ठेवलेली भांडी जमिनीवर कोसळली. अनेकांना शेतात जमिनीला हादरा बसतोय असे लक्षात आले. या प्रकारामुळं ग्रामस्थांमध्ये भीती पसरली होती. अनेक जण घराबाहेर धावत येऊन मोकळ्या जागेवर उभे राहिले होते. दोन वर्षांपूर्वी देखील जमिनीला हादरा बसल्याची घटना घडली होती, असे गावकऱ्यांनी सांगितले.

शिरजगाव मोझरी येथे भूकंपाचे धक्के बसल्याबाबत नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी या संस्थेच्या यांच्या संकेतस्थळावर भूकंपाचे धक्के बसल्याबाबत कोणतीही नोंद आढळली नव्हती. तहसीलदारांसह महसूल विभागांचे पथक शिरजगाव मोझरी गावात जाऊन आलेत. गावात कोणतेही नुकसान झाले नाही असे आढळले होते.

जून महिन्यात चार तारखेला रात्री नऊ वाजता अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर रिश्टर स्केलवर ३.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ही माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने तसेच नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली होती. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते. मध्य प्रदेशातील खंडवा आणि बऱ्हाणपूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून दहा किलोमीटर खाली होता.