नागपूर : केंद्र सरकारमधील तीन खात्यांनी एकत्र येत आयुर्वेदाचा रक्तशयावरील परिणाम जाणण्यासाठी देशभरातील ७५ हजार किशोरवयीन मुलींना आयुर्वेदाची मात्रा दिली. यात गडचिरोलीतील मुलींचाही समावेश आहे. या एकंदरीत नाविन्यपूर्ण संशोधनात्मक प्रकल्पाबाबत आपण जाणून घेऊ या.
केंद्र सरकारमधील महिला व बालविकास खाते, आयुष मंत्रालय, आदिवासी कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने या संशोधनात्मक प्रकल्पावर काम सुरू आहे. सदर प्रकल्पानुसार महाराष्ट्रातील गडचिरोलीत २२ हजार किशोरवयीन मुलींना आयुर्वेदाची मात्रा देण्याची जबाबदारी नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानकडे होती. ही संस्था आयुष मंत्रालयाच्या अखत्यारित येते. त्यानुसार २०२४-२५ दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना रोज सकाळ आणि संध्याकाळ लोह व इतर घटक असलेली गोळी व एक चटणीसदृश द्रव्य दिले गेले.
आसाम, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यातील प्रत्येकी एक जिल्हा निवडून तेथेही एकूण ७५ हजार किशोरवयीन मुलींना ही मात्रा दिली गेली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून निष्कर्ष मात्र केंद्र सरकारच्या आयुष विभागाकडूनच जाहीर केले जाणार असल्याचे नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान केंद्राचे सहाय्यक संचालक (आयुर्वेद) डॉ. एम.एन. सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या प्रकल्पासाठी इंडियन इन्स्ट्यिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थकडूनही अभ्यास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान केंद्राचे म्हणणे काय ?
केंद्र सरकारकडून आयुर्वेदाला महत्त्व दिले जात आहे. आयुर्वेद औषधे विविध आजारांसह रक्ताशयासाठीही गुणकारी आहेत. त्यानुसार गडचिरोलीतील २२ हजार तर देशातील ७५ हजार किशोरवयीन मुलींना आयुर्वेद औषधांची मात्रा दिली गेली. त्याचे निष्कर्ष लवरकरच समोर येतील, अशी माहिती नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान केंद्रचे सहाय्यक संचालक ( आयुर्वेद) डॉ. एम. एन. सूर्यवंशी यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.