बुलढाणा : बाबरी मशीद पतनप्रकरणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून राजकीय वादळ उठले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. मी कारसेवक म्हणून अयोध्याला गेलो असल्याने त्यावेळी कोण-कोण तिथे होते हे मला चांगले ठाऊक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या राज्य मंत्रिमंडळातील केवळ देवेंद्र फडणवीस हेच कारसेवक म्हणून तेथे होते, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

खडसे यांनी जितेंद्र जैन यांच्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला

आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर खडसे यांनी जितेंद्र जैन यांच्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी बाबरी मशीद पतनसंदर्भात माहिती दिली. मी दोनदा कारसेवक म्हणून आंदोलनात सहभागी झालो. मी लाठ्या खाल्ल्या, त्यात माझ्या डोक्याला दुखापत झाली आणि नंतर पंधरा दिवसांचा कारावास भोगला. आजच्या राज्याच्या मंत्रिमंडळातील ९९ टक्के मंत्री कारसेवेत नव्हते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस वगळता अन्य कोणी नेता कारसेवेत नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्कालीन एकसंघ शिवसेनेचा सहभाग कमी असला तरी काही नेते होते, अशी माहितीही त्यांनी दिली. या घडामोडींचे श्रेय घेण्याचे भाजपने टाळले. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हे कृत्य माझ्या सैनिकांनी केले असेल तर मला त्याचा अभिमान आहे’, असे ठणकावून सांगितले होते, याचे स्मरण आ. खडसे यांनी यावेळी करून दिले. भाजपची त्यावेळची भूमिका तळ्यातमळ्यात अशीच होती, अशी टीकाही खडसे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गटाचे अस्वस्थ आमदार लवकरच बाहेर पडतील

राज्य सरकारचा कारभार व भवितव्याबद्दल विचारणा केली असता, शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता व नाराजी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने अनेक आमदार व बच्चू कडूंसारखे अपक्ष आमदार नाराज आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ येतील आणि न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा शिंदे गटातून हे आमदार बाहेर पडतील, असे भाकीतही आ. खडसे यांनी यावेळी केले.