नागपूर: बुलढाणा जिल्ह्यातील चिखला ह्या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला एकनाथ वाघ याला जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड विद्यापीठात ‘पब्लिक पॉलिसी’ शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. त्याचा हा प्रवास साधा नसून संघर्ष, चिकाटी आणि सततच्या परिश्रमाची एक अनोखी गोष्ट आहे.

एकनाथची शिक्षणयात्रा एका जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाली. तेथून त्याने नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला. लहानपणापासून सरकारमार्फत मिळालेल्या मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाने त्याच्या ज्ञानाचा पाया रचला. पुढे उच्चशिक्षणासाठी तो पुण्यात आला आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर, एकनाथने देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी केली. जरी यश आले नसले तरी, ही तयारी त्याच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली. मग त्याने पुणे विद्यापीठातून शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.ए.) मिळवली.

एकनाथचे स्वप्न आहे की, अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या त्याच्या विषयांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशातील गरीबी व प्रचंड असमानता कमी करणे आणि तळागाळातील लोकांचे जीवन उंचावणे. हे स्वप्न साकार करण्यासाठीच त्याने हार्वर्डसारख्या विद्यापीठात पब्लिक पॉलिसी शिकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वाटते की, योग्य धोरणे (पॉलिसी) करूनच समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचे जीवन बदलता येऊ शकते.

गेली तीन वर्षे त्याचा परदेशी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा संघर्ष चालू होता. पहिल्याच वर्षी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातून त्याला प्रवेश मिळाला होता, पण आर्थिक मदत (स्कॉलरशिप) मिळाली नाही म्हणून तो जाऊ शकला नाही. मागच्या वर्षी हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही शासकीय स्कॉलरशिपच्या काही तांत्रिक अडचणीमुळे तो जाऊ शकला नाही. परंतु, यावर्षी त्याच्या अथक परिश्रमामुळे आणि निकडीच्या चिकाटीमुळे शेवटी तो हार्वर्डला जात आहे.

याच सुमारास, तो स्वत:च्या तयारीबरोबरच गेली दोन वर्षे ‘एकलव्य संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर्स’ या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. येथे तो दुर्बल घटकातील मुलांना जागतिक विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो. शिवाय, शासकीय शिष्यवृत्ती धोरणात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी तो सक्रियपणे पाठपुरावा करतो. विदेशी विद्यापीठांसाठी अर्ज करणाऱ्या आणि शासकीय शिष्यवृत्तीसाठी योग्य असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या बदलांद्वारे मदत मिळावी, यासाठी तो कार्यरत आहे.

सामान्य जनतेचा अभिमान बनला

ज्या कुटुंबात आई-वडिलांनी कधी शाळेची सावलीसुद्धा पाहिलेली नाही, त्या शेतकरी कुटुंबातून यशाच्या शिखरावर पोहोचणारा एकनाथ वाघ हा आज लाखो ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणा बनला आहे. एकनाथचं यश केवळ त्याचं नसून, त्याच्या आई-वडिलांच्या संघर्षाचंही फळ आहे. ते

स्वतः शिकले नाही, पण मुलाला शिकवण्यासाठी सर्व काही केले. आज हार्वर्डचा प्रवेश हा या शेतकरी कुटुंबाचा विजय आहे. त्याचा प्रवास सांगतो की, मनोबल आणि मेहनत असली तरी कोणतेही स्वप्न शक्य आहे. एकनाथ आता संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा अभिमान बनला आहे.