चंद्रपूर : भाजप महानगर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या तुकूम येथील महिला पतंजली नारीशक्ती योग कक्ष येथे विद्याुत खांबावर आकोडा टाकून वीज चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पथकाने उघडकीस आणले आहे. दरम्यान ही वीज चोरी उघडकीस येताच या योग कक्षाचा अनधिकृत विज पुरवठा खंडीत करण्यात आला असून पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

तुकूम परिसरात खत्री कॉलेजच्या मागील भागात संगीत नगर येथे चव्हाण ले आऊट आहे. मागील ४० ते ५० वर्षापासून येथे रहिवासी वास्तव्याला आहेत. या भागाचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी कॉलनीतील महिलांना योग करण्यासाठी महिला पतंजली नारीशक्ती योग कक्षाचे बांधकाम करून दिले. मात्र या याेग कक्षात विद्याुत व्यवस्था नाही. त्यावर उपाय म्हणून महिला नारीशक्ती योग समितीच्या महिलांनी तिथेच बाजूला असलेल्या विद्याुत खांबावरून अनधिकृतपणे आकोडा टाकून वीज घेतली. या प्रभागातील महिला पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत येथे योगाभ्यास करतात.

तेव्हा योग कक्षात संचालक मंडळानी एकुण ३ फोकस लाईट, १ लाईट व तिन पंखे व १ मोठा लॉउड स्पीकर अशा प्रकारचे विदयुत उपकरणे लावण्यात आलेले आहे. हे सर्व लाईट आणि वीज उपकरणे २४ तास सतत सुरु असतात. दरम्यान प्रभागातील सुजाण नागरिकांनी या अनधिकृत वीज पुरवठ्याची तक्रार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान तक्रारीनंतर वीज वितरण कंपनीचे वीज चोरी उघडकीस आणणारे पथक गुरूवारी संबंधित ठिकाणी येवून धडकले. तेव्हा योगकक्षाच्या बाजुला असलेल्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट क्रं. ४-५२६ वरुन अनधिकृत वीज कनेक्शन घेण्यात आल्याचे दिसून आले.

हा प्रकार दिसताच महावितरण वीज चोरी प्रकरणांमध्ये वीज कायदा, २००३ कलम १३५ अंतर्गत महिला पतंजली नारीशक्ती योग कक्षातील सर्व विदयुत उपकरणे ताब्यात घेण्यात येउन, योगकक्षातील पदाधिकाऱ्यांविरूध्द कारवाई केली. दरम्यान भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी बांधून दिलेल्या या योगकक्षात अशाप्रकारे अनधिकृत वीज पुरवठा सुरू होता. या अनधिकृत वीज कनेक्शनला नेमके कुणाचे पाठबळ होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान या योग कक्षाची तक्रार पतंजली समितीकडेही करण्यात आली आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील योगकक्ष, नेते, पदाधिकारी यांनी बांधून दिलेल्या भवनात असे प्रकार सुरू आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे.