गोंदिया : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व पाटबंधारे मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार,  भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. महादेवराव शिवणकर यांचे आज, सोमवारी (दि. २०) आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर उद्या, मंगळवारी (दि. २१) सकाळी १० वाजता साकरीटोला घाट, सालेकसा मार्ग, आमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार शिवणकर यांनी केली होती. त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना गोंदिया जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच जिल्ह्यात कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार, यांसारख्या सिंचन प्रकल्पांची निर्मिती झाली.

२६ जानेवारी १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवणकर यांनी गोंदिया जिल्ह्याची घोषणा केली आणि १ मे १९९९ रोजी गोंदिया जिल्हा अस्तित्वात आणून कार्यभार सुरू केला. गोंदिया जिल्हा निर्मितीचे ते खरे शिल्पकार ठरले. मात्र, त्यांनी गोंदिया जिल्हा निर्मितीचे श्रेय सर्वांना दिले.

विधानसभा निवडणुकीदरम्यान आमगाव येथे प्रचाराला आले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवणकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

शिवणकर यांचा जीवनप्रवास

– जन्म : ७ एप्रिल १९४० (रविवार)

– जन्मस्थळ : आमगाव, जिल्हा गोंदिया

– शिक्षण : एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(इतिहास)

– व्यवसाय : शेतकरी (मूळ), माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास), भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्र)

– २६ जुर्ले १९७५ रोजी आणिबाणीकाळात तुरुगांत गेले

राजकीय वाटचाल

– १९७८ ते २००८ पर्यंत निवडणुकीत अजिंक्य

– विधानसभा सदस्य : १९७८ ते १९८९ ( तीन वेळा आमगाव विधानसभा)

– १९९४ ते २००४ (दोन वेळा आमगाव विधानसभा)

– कॅबिनेट मंत्री पाटबंधारे, वित्त व नियोजन (१९९९-२००४)

– संसद सदस्य : १९८९ ते १९९४ व २००४ ते २००८

– २००४ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत केली होती.

– भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात मोठे योगदान.

– २००८च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने प्रा. शिवणकर यांना तिकीट नाकारली होती.

समिती सदस्य

– वैधानिक समित्यांचे सदस्य अंदाजपत्रीय समिती, रोहयो समिती, वनविकास समिती, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, मागासवर्गीय समिती, आदिवासी विकास समिती. लोकसभा समित्या स्थायी समिती, कृषी समिती,रेल्वे समिती, संरक्षण समिती, संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (२००४-०८), रसायन व खते मंत्रालयसंपर्क समिती (२००४-०८), भारतीय कृषी परिषदेचे कार्यकारी सदस्य, भारत सरकारची संशोधन संस्था (२००४-०८)

पुस्तके

१) गजाआड (मराठी आणीबाणी काळातील डायरी)

२) भारताची आर्थिक स्थिती (मराठी)

३) विदर्भ झालाच पाहिजे (मराठी)

४) केनिया सफारी (मराठी) ५) भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांवर लेख