चंद्रपूर : बीड जिल्ह्यातील बनावट दारू चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यात तस्करीच्या माध्यमातून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर येथील प्रशांत तानबाजी चंदनखेडे हा या तस्करीतील मुख्य सूत्रधार आहे. दरम्यान, हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. बल्लारपुरातील एका वाईन शॉपमध्ये बनावट देशी दारूच्या पेट्या मिळाल्या. तर चिमूर, ब्रम्हपुरी व सावली तालुक्यात ही बनावट दारू १८०० रुपये पेटी या दराने मोठ्या प्रमाणात येत आहे.

या जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून बनावट देशीविदेशी दारू येत असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथून ही बनावट दारू येत असल्याचे समोर आले. पोलिसांनी याचा मागोवा घेत २ मे रोजी चिमूर तालुक्यातील मौजा बंदर शिवापूर येथे लाखो रुपयांची बनावट देशी दारू जप्त केली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अधिक तपास केला असता बीड जिल्ह्यातून ही बनावट देशी दारू वर्धेत येते, अलीपूर येथे ही दारू बाटलीबंद करून ट्रक तसेच विविध वाहनांच्या मदतीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात पाठवली जाते. या बनावट दारूतस्करीचा मास्टर माईंड हा अलीपूर येथील प्रशांत तानबाजी चंदनखेडे हा आहे.

राजकीय आशीर्वाद असलेला प्रशांत मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायात सक्रिय आहे. प्रशांत हा स्वत:ही अलीपूर येथे सभापती आहे. राजकीय आशीर्वादाने त्याचा हा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र चिमूर व गोंडपिंपरी येथे बनावट दारू पकडताच या संपूर्ण बनावट दारू तस्करीचे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनीही आरोपी चंदनखेडे याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

प्रयोगशाळेत तपासणी

बल्लारपूर शहरातील मिलिंद वाईन शॉप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून सदर वाईन शॉप पंधरा दिवसांसाठी बंद केले आहे. तीन महिन्यांपूर्वी गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट दारू पकडण्यात आली होती. त्याचे धागेदोरे या वाईन शॉपसोबत जोडले गेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या वाईन शॉपमधील काही दारू पेट्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई करून वाईन शॉपला ‘सील’ केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कठोर कारवाई करणार – जिल्हाधिकारी

अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे. अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक नियमितपणे कारवाईचा आढावा घेईल. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करून प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.