रात्री नऊच्या आत घरात परतावे लागणार
नागपूर : मावळत्या वर्षांला निरोप आणि मध्यरात्री १२ च्या ठोक्याला नववर्षांचे दणक्यात स्वागत करण्याच्या नागपूरकरांच्या इच्छेला यंदाही करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे मुरड घालावी लागणार आहे. बुधवारी जिल्ह्यासाठी तर गुरुवारी शहरासाठी अनुक्रमे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात आदेश काढून नववर्षांच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. रात्री ९ पर्यंतच जीवनावश्यक सेवांचा अपवाद वगळता हॉटेल, रेस्टॉररन्ट, मॉल्स सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र तेथेही नववर्षांचे कार्यक्रम घेता येणार नाही किंवा डी.जे. सुद्धा वाजवता येणार नाही. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उदा. उद्याने, मैदाने, निवासी संकुलात किंवा तत्सम ठिकाणी नववर्षांचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. त्यामुळे घरातील चार भिंतीच्या आतच मावळत्या वर्षांला निरोप व नववर्षांचे स्वागत नागपूरकरांना करावे लागणार आहे. यंदाचे अशाप्रकारचे हे दुसरे वर्ष आहे. एरवी ३१ डिसेंबरला मध्यरात्रीपर्यंत विविध हॉटेल्समध्ये रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल असते हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, मद्यालये (बार) रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
२,५०० पोलिसांचा ताफा, ७५ ठिकाणी नाकेबंदी!
उपराजधानीत ३१ डिसेंबरला अडीच हजार पोलीसांचा ताफा तैनात करण्यात येणार असून ७५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. विविध नाक्यांवर सशस्त्र पोलीसांचे पथक तैनात राहणार असून मद्यपान करून हुडदंग घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. गुरूवारी पोलीस आयुक्तांसह सहआयुक्त अस्वती दोरजे यांनी पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यानंतर अमितेशकुमार पत्रकारांशी बोलत होते. नववर्षांच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी खास उपाययोजना केली आहे. मद्यपान करून रस्त्यावर हुडदंग घालणाऱ्यांना थेट पोलीस कोठडीत डांबण्यात येईल. नागरिकांनी कुटुंबातील सदस्यांसह घरी नववर्ष साजरे करण्याला कोणतीही हरकत नाही. मात्र अपार्टमेंट व सोसायटीतील पाटर्य़ावर पूर्णत: बंदी असेल. याशिवाय शहरालगतच्या ढाब्यांचीही झडती सुरू आहे. अपघात होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांनीही विशेष सूचना केल्या. नववर्षांचे स्वागत करताना नागरिकांनी संयम बाळगावा, पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन अमितेशकुमार यांनी केले. दरम्यान बंदोबस्तानिमित्त पोलीस आयुक्तालय हद्दीत १०० फिक्स पॉईंट, १०० जीप पेट्रोिलग, १५० बीट मार्शल, १२ गुन्हे शाखाचे पथक, ४ बॉम्ब शोधन नाशक पथकही तैनात असणार आहे.
लोकांचे प्राण महत्त्वाचे
करोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने शहरात निर्बंध लावण्यात आले आहेत. रात्री ९ नंतर आवश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने व हॉटेल्स बंद राहणार आहेत. लोकांनी गर्दी टाळावी.
– नितीन राऊत, पालकमंत्री.