यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढावा, या मागणीसाठी आज शुक्रवारी शहरात शेतकरी चळवळीच्या नेतृत्वात व संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.

संविधान चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मूलभूत व तातडीच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या.यामध्ये इ पिक पाहणीतील त्रुटी दूर करून कालावधीवाढ, कापूस व सोयाबीनला हमीभाव,कापूस आयातबंदी, किसान ॲपमधील त्रुटी दूर करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत,ओला दुष्काळ जाहीर करणे,कर्जमाफीची अंमलबजावणी तसेच सीसीआय व नाफेडच्या खरेदी व्यवस्थेत सुधारणा यांसारख्या मागण्या प्रमुख आहेत.

या मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलाश खंडारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख, ऍड.सीमा तेलंगे, शेतकरी आंदोलक सचिन मनवर, प्रा.पंढरी पाठे, शेतकरी नारायण बेंडे, शुभम बेंडे, राहुल मांगूळकर, विद्या परचाके, मंगला सोयाम, लियाकत शेख, लीना नैताम, संगीता मडावी, रेखा सीडाम, विनोद दोंदल, आदेश रोडे, बाळू निवल, वृषभ गुल्हाने, संतोष कोरडे, संभाजी भिवकर, संतोष गोरलेवार, संतोष जुमनाके, गजानन गेडाम, दामोदर बेंडे, मनोज पाचघरे, हरी वाडेकर, संतोष इटकरे, प्रकाश कांबळे, मनोज झाडे, राजू बाहेकर, अमन माळोदे आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व नाफेडच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आजपासूनच सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा ही लढाई आणखी तीव्र करण्यात येईल , असा इशारा शेतकरी आंदोलक सचिन मनवर यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल, असे अभिलाष खंडारे म्हणाले. तर, शेतकऱ्यांचा घामाला दाम मिळाला पाहिजे अन्यथा हा अन्यायाचा इतिहास शेतकऱ्यांच्या आक्रोशाने लिहिला जाईल, असे प्रा.पंढरी पाठे म्हणाले.