नागपूर : पक्की घरे नसणाऱ्यांना घरकूल देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान घरकुल  योजनेसाठी राज्यातील विविध जिल्ह्य़ातून आलेल्या १९ लाख ५७,९३८ अर्जापाकी ९ लाख ९१,२८४  (५०.६२ टक्के) मंजूर झाले तर उर्वरित म्हणजे  ९ लाख ६६ हजार ६५४  मंजूर झाले. नागपूर जिल्ह्य़ात ही संख्या ३३ हजाराच्या घरात आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान घरकूल योजनेची सुरुवात २०१४ पासून सुरू झाली. त्यातील तरतुदीनुसार घरापासून कोणीही गरजू वंचित राहू नये म्हणून लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार ग्रामीण भागात ग्रासभेला दिले आहेत. केंद्रीय ग्रामविकास खात्याकडे आतापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार महाराष्ट्रात १९ लाख ५७,९३८ अर्ज आले होते. त्यापैकी ५०.६२ टक्के मंजूर म्हणजे ९ लाख ९१,२८४ मंजूर झाले. ९ लाख ६६ हजार ६५४ नामंजूर करण्यात आले. नागपूर जिल्ह्य़ाचा विचार केला तर तिसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या एकूण ९१ हजार ३२९ अर्जापैकी ५४,९७९ पात्र ठरले.  नागपूर जिल्ह्य़ातील येणीकोणी गावातून २३० लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली होती. त्यापैकी फक्त दोन नावे पात्र ठरली. अशीच स्थिती इतरही गावात व राज्यातही आहे. ही योजना जिल्हा पातळीवर राबवणाऱ्या डीआरडीएचे अधिकारीही गरजूंची नावे वगळल्याची बाब मान्य करतात. पण नंतरच्या यादीत ही नावे समाविष्ट करण्याची संधी असल्याचेही सांगतात.

नागपूर जिल्ह्य़ातील येणीकोणीचे सरपंच मनीष फुके म्हणाले, यादी अंतिम करण्याचे अधिकार जर ग्रामसभेला असेल तर त्यांनी दिलेली नावे पात्र ठरणे अपेक्षित आहे. जिल्ह्य़ातील खुर्सापारचे सपरंच सुधीर गोतमारे म्हणाले, निकष लक्षात घेऊन आम्ही यादी तयार केल्याने अपात्र कमी ठरले.

देशातील घरकुलांची स्थिती

नोंदणी- २ कोटी १८ लाख ३०,४०२

अर्ज मंजूर -२ कोटी ६ लाख ९५,२२८

महाराष्ट्रातील स्थिती-

नोंदणी-१९ लाख ५७,९३८

अर्ज मंजूर- ९ लाख ९१,२८४

नागपूर जिल्हा-नोंदणी-९१ हजार ३२९ मंजूर-५४,९७९

शासनाच्या निकषानुसारच याद्यांना अतिम रूप दिले जाते, निकषात न बसल्याने काही नावे वगळली गेली असली तरी ग्रामसभेने सूचना केल्यावर पुढच्या यादीत ती समाविष्ट करण्याची संधी आहे.

विवेक ईलमे, प्रकल्प अधिकारी, डीआरडीए, नागपूर.

आम्ही २३० नावांची यादी पाठवली होती, पण त्यापैकी फक्त दोनच नावे मंजूर झाली, एका शेतकऱ्याकडे केवळ त्याच्याकडे कृषी उपकरण आहे, म्हणून अपात्र ठरवण्यात आले.

मनीष फुके, सरपंच, येणीकोणी जि. नागपूर