नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्न सोहळे यामुळे कुटुंबासह रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जात आहे. मुलबाळ सोबत असल्याने प्रवासात विशेष काळजी घ्यावे लागते. आरोग्य आणि इतर अनेक गोष्टीबाबत जागरूक असणे आवश्यक असते. असे असलेतरी लहान मुलांकडून काही गोष्टी अनपेक्षित घडत असतात. परंतु बालकाने बर्थ लघवी केल्यामुळे एका रेल्वे डब्यात चक्क हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. रेल्वे प्रवासात बालकाने आसनावर (बर्थवर ) लघवी केल्याने त्या बर्थवरील इतर प्रवाशांना संतापून चिमुकल्याच्या आईवडील आणि मामाला बेदम मारहाण केली. सुभेदारगंज मेलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील अन्सार अहमद चांद अली (वय २०) त्याची बहीण, जावयांसह सुभेदारगंज स्पेशल एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये बसून हैदराबादला जात होते. अन्सारची बहीण तिच्या बालकासह वरच्या बर्थवर बसून होती. ही गाडी मध्य प्रदेशातील बैतूल-आमला स्थानकाजवळ असताना अन्सारच्या भाच्याने लघवी केली. त्यामुळे खाली बसलेल्या आरोपी राकेश निशाद ललपुराम (वय २५) याचे कपडे ओले झाले. परिणामी, चिडलेल्या राकेश आणि त्याच्या साथीदाराने अन्सार, तसेच त्याच्या परिवारातील सदस्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर आता पुढे जे रेल्वे स्थानक येईल, त्या स्थानकावरर उतरून दुसऱ्या डब्यात बसण्याचे सांगितले. अन्सार आणि त्याच्या नातेवाइकांनी नकार दिल्यामुळे राकेशने दुसऱ्या डब्यामध्ये बसलेल्या आपल्या दोन साथीदारांना फोन करून बोलावून . त्यानंतर, त्या तिघांनी अन्सारला बेदम मारहाण केली. त्याची बहीण आणि जावई समजावण्यासाठी पुढे आले असता, त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. एका आरोपीने पॅन्टचा पट्टा काढून अन्सारला जोरदार मारहाण केली. पट्टाचे बक्कल डोक्याला लागल्याने अन्सार रक्तबंबाळ झाला. घटना आमला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत झाल्याने नागपूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा आमला पोलिसांकडे वर्ग केला.
दरम्यान, अन्सारच्या जावयाने रेल्वे हेल्पलाइनवर फोन करून तक्रार नोंदविली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या पथकाने ही गाडी नागपूर स्थानकावर येताच, जखमींना खाली उतरवून घेतले. अन्सारी आणि त्याच्या बहिणीवर उपचार करून त्यांची तक्रार लिहून घेतल्यानंतर आरोपी राकेश ललपुराम, कृष्णकांत गंधालाल (वय २३) आणि रंगबहादूर सूरमई (वय २६, रा. तिघेही सुलमई धखारा, प्रयागराज) या तिघांना अटक केली.