लोकसत्ता टीम

नागपूर : हिंदुस्थानावर शेकडो आक्रमणे होण्यास येथील हिंदूंचा स्वभावगुण कारणीभूत आहे. हिंदू आत्मविश्वास शून्य आहे. स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा देण्याची या समाजाची वृती आहे, असे मत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड, गीता मंदिर येथे बुधवारी मार्गदर्शन बैठक आयोजित केली होती. यावेळी भिडे बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानाला ९६ हजार वर्षांचा इतिहास आहे. मूळ हिंदुस्थान हिमालयापासून ते हिंदी महासागराच्या मध्यापर्यंत आहे. यामध्ये जपान, चीन, ब्रम्हदेश, श्रीलंका, अंदमान, निकोबार, अफगाणिस्तान, इराण, इराक, इजिप्त, हा सगळा प्रदेश पूर्वी हिंदुस्थान म्हणून ओळखला जायचा. ज्यावेळी जगात एकही राष्ट्र नव्हते, तेव्हा हिंदुस्थान होते. हिंदुस्थान संपूर्ण जगाला कुटुंबाप्रमाणे मानत होता आणि आईप्रमाणे जगाची काळजी घेत होता. परंतु कृतघ्न मुलांप्रमाणे इतर राष्ट्रांनी हिंदुस्थानवर आक्रमण केले. हिंदुस्थानची आतापर्यंत २८ वेळा शकले पडली. अफगाणिस्तान ३४० वर्षांपूर्वी शंभर टक्के हिंदू प्रदेश होता. आता शंभर टक्के मुस्लीम प्रदेश आहे.

आणखी वाचा-वर्धा: रस्ते खचले अन् पुलावरून पाणी; लोक अडकले, घराबाहेर न पडण्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदुस्थानावर जितकी परकीय आक्रमणे झाली, तितकी आक्रमणे कोणत्याही देशावर झाली नाहीत. जगातील १८७ राष्ट्रांपैकी ७६ राष्ट्रांनी हिंदुस्थानावर आक्रमणे केली. जगातील ५२ मुस्लीम राष्ट्रांपैकी ३९ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणे केली. आपण शेकडो वर्षे गुलामीत होतो. याचे कारण, हिंदूंचा स्वभावगुण आहे. हिंदू म्हणजे आत्मविश्वास नसलेला माणूस. हिंदू माणसाचा आत्मविश्वास शून्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूमधील आत्मविश्वास जागृत करण्याचे काम केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याला पुढे नेण्याचे काम अल्प आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांनी केले, असेही ते म्हणाले.