नागपूर: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध नसला तरी यातील आरोपी वाल्मिक कराड त्यांच्या जवळचा आहे. त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. त्यानंतर आता भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव सरकारावर येऊ लागला आहे. आजपासून अधिवेशन सुरू होत असल्याने विरोधकही याच मुद्यावर सरकारला घेरणार असल्याचे दिसते. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय झाला असल्याचा दावा केला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

मुनगंटीवार म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसात घेणार की नाही हे मला माहीत नाही. यावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यांच्याकडे गृह खाते आहे. पोलिस विभागाने त्यांना या संदर्भात काही माहिती दिली असेल, याशिवाय कृषी घोटाळ्याच्या आरोपावर कृषी विभागाच्या सचिवांनी त्यांना काही पुरावे दिले असतील तर ते निश्चितच निर्णय घेतील असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप हे खरे असतील, त्यांचा आणि आरोपी वाल्मिक कराडचा संबंध असेल तर त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. आरोप खोटे असतील आणि त्यात काही तथ्य नसल्यास मुख्यमंत्र्यांनी याची माहिती सभागृहात द्यावी लागेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. याच काळात सरपंच देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण घडले होते. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यनंतर एक रुपयात पीक विमा योजनेतील घोटाळ्याच्या विषय समोर आला होता. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा सभागृहात उघड केला होता. विरोधकांनीही नंतर हा घोटाळा उचलून धरला. त्यानंतर अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे सादर करून कसा घोटाळा घडला याची माहिती जाहीर केली होती.