माजी आमदार आशीष  देशमुख यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष  मल्लिकार्जुनजी खरगे यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसची चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून  नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून कॉंग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा  विजय झाला.

हेही वाचा >>> ‘शिक्षक संघटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला’; नाना सातपुते यांची खंत

जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एक चे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉंग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही. 

हेही वाचा >>> “माझा विजय निश्चित होता” माघार घेणारे शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांचे विधान; म्हणाले “पक्षाच्या आदेशापुढे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व बाजूंनी कॉंग्रेस सपशेल तोंडघाशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागेवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वत:च्या सत्तेची पडलेली आहे. अशा कॉंग्रेस विरोधी घटना घडत असतांना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.