नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अजनी ते पुणे, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते वैष्णोदेवी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला १० ऑगस्टला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपुरातून सध्या सिंकदराबाद, बिलासपूर आणि इंदूर अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. अजनी-पुणे ही चौथी वंदे भारत ठरणार आहे.

अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा उदघाटन सोहळा रविवारी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आला आहे. या उदघाटनीय गाडीतून विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, शाळकरी मुले, एनसीसी कॅडेटस, राजकीय नेते, पदाधिकारी यांना प्रवास घडवला जाणार आहे. या गाडीसाठी रेल्वे तिकीट उपलब्ध नाहीत. प्रवासासाठी विशेष पास तयार करण्यात आला असून पासधारकांना मोफत प्रवास राहणार आहे.

दरम्यान, शिक्षण आणि नोकरीसाठी विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही गाडी नागपूरहून सोमवार आणि पुण्याहून मंगळवार वगळता आठवडाभर धावणार आहे.

या गाडीचा १२ तासांचा प्रवास असून ‘चेअर कार’ची सुविधा आहे. आठ तासांपेक्षा अधिक तासांचा प्रवास असल्याने या वंदे भारत एक्सप्रेसला शयनयान (स्लीपर) डबे असतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतु दिवसभराचा प्रवास असल्याने स्लीपर ऐवजी ‘चेअरकार’ असलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौड, अहिल्यानगर, कोपरगाव, शेगाव थांबणार आहे.

सध्या नागपूर ते पुणे अंतर कापण्यासाठी दुरान्तोला १२ तास ५५ मिनिटे वेळ लागतो. वंदे भारत एक्स्प्रेसला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे. यासोबत नागपूरमार्गे पुणे-रिवा साप्ताहिक गाडी सुरू झाली आहे. यापूर्वी गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूरमार्गे गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस आहे. दरम्यान, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर, पुणे आणि मुंबई दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत. दिवसभर प्रवास पुण्याहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटेल, अजनीला सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. तर अजनीहून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल, पुण्याला रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे दिली आहे.