लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नागपूर शहरातील सहापैकी तीन जागांवर पक्षाने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. त्यात मोठे नाव आहे ते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे.

नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी निवडून गेले. हा त्यांचा सलग तिसरा विजय होता. मात्र देवेंद्र फडणवीस हे सलग सहाव्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ते दोन वेळा पश्चिम नागपर या मतदारसंघातून तर तीन वेळा दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सलग २५ वर्ष विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. आमदार नंतर थेट मुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि आता उपमुख्यमंत्री अशी त्यांची विधिमंडळातील कारकीर्द आहे.

आणखी वाचा-उद्धव ठाकरे यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी…

भाजपचे दुसरे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे सलग चौथ्यांदा पूर्व नागपूर या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेत खोपडे यांनी त्यावर आपली भक्कम पकड कायम करीत सलग तीन वेळा ते येथून मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही ही चौथी विधानसभेची निवडणूक आहे. २००४ ते २०१४ अशा तीन निवडणुका त्यांनी कामठी मतदारसंघातून जिंकल्या.

२०१९ मध्ये मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. नंतर ते विधान परिषदेवर गेले. पाच वर्षानंतर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. हिंगण्यातून उमेदवारी मिळालेले समीर मेघे यांची ही तिसरी निवडणूक आहे. यापूर्वी दोन निवडणुका त्यांनी या मतदारसंघातून चढत्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार मोहन मते यांचीही ही तिसरी निवडणूक आहे. एकदा ते आमदार होते. नंतर त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

आणखी वाचा-काँग्रेससमोर पेच; मुस्लीम की हलबा उमेदवार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूरमधील भाजपचे आणखी एक विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्या उमेदवारीचा निर्णय प्रलंबित आहे. ते तीन वेळा मध्य नागपूरमधून विजयी झाले आहेत.पक्षाने त्यांच्या नावाचा पुन्हा एकदा विचार केल्यास त्यांची ही चौथी निवडणूक ठरेल. त्यांच्या जागेवर तिकीट मागणारे आ. प्रवीण दटके यांची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक ठरेल. ते सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. भाजपने नागपूरमध्ये दिलेल्या पाच उमेदवारांमध्ये सर्व दीर्घ अनुभवी आहेत. एकही नवा चेहरा नाही.