अमरावती: अनेक जबरी गुन्हे करून पसार झालेल्‍या, पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस सक्रिय झाले असून पुण्‍याहून अमरावतीत आश्रयासाठी आलेल्‍या दोन गुन्‍हेगारांना पोलिसांनी आशियाड कॉलनी चौकातून ताब्‍यात घेतले. त्‍यावेळी ते कारमध्‍ये होते. आरोपी हे पुणे जिल्‍ह्यातील मुळशी तालुक्‍यातील गुन्‍हेगार टोळीचे सदस्‍य असल्‍याची माहिती मिळाली आहे.

विपुल उत्तम माझिरे (२६, रा. रावडे ता. मुळशी) व प्रदीप उर्फ पंकज धनवे (२०, रा सिंहगड रोड, दत्तवाडी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर संतोष धुमाळ (रा. मुळशी, पुणे) हा तिसरा आरोपी पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला. पुण्याच्या पौड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्हयातील संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आले आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमरावती शहर पोलिसांना १९ नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती.

हेही वाचा… नागपूर: दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी अमरावती शहरातील हॉटेल तसेच आरोपींच्या संभाव्य राहण्याच्या ठिकाणांचा शोध घेतला. स्थानिक गुंड सागर खिराडे याच्यासोबत अन्य शहरातील तीन व्यक्ती कारमधून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. ती कार आशियाड कॉलनी चौकात दिसून आला. पोलिसांना पाहताच खिराडे हा तेथून अंधाराचा फायदा घेवून एका इसमासह पळून गेला. तर विपुल व प्रदीप हे दोन आरोपी गुन्हे शाखेच्या हाती लागले.

आरोपी हे दोन दिवसांपासून अमरावतीच्या शेगाव परिसरात राहत होते. त्यांना अमरावती येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सागर खिराडे याने आश्रय दिल्याची कबुली अटक आरोपींनी दिली. पळून गेलेला संतोष धुमाळ व अटकेतील आरोपी विपुल माझिरे हे मोक्का केसमधील आरोपी असून दोन ते तीन महिन्यांपूर्वीच त्‍यांची कारागृहातून सुटका झाली होती.