गडचिरोली : पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या बटालियन क्र. १ चा कमांडर कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा याची दंडकारण्य विशेष झोनल समितीच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) संघटनेच्या नेतृत्वात झालेल्या या बदलामुळे दंडकारण्याच्या संपूर्ण भागावर हिडमाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच दंडकारण्याची जबाबदारी गैरतेलुगू व्यक्तीकडे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच ओडिशा आणि तेलंगणाच्या सीमा भागाला नक्षल चळवळीत दंडकारण्य झोन म्हणून ओळखल्या जाते. सद्याच्या घडीला याच परिसरात नक्षल्यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच छत्तीसगडमधील अबुजमाड हे दंडकारण्याची राजधानी मानल्या जाते. त्यामुळे या झोनच्या प्रमुखाला नक्षल चळवळीत मोठे स्थान आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबातून आलेल्या हिडमाला मिळालेल्या बढतीने पुन्हा नक्षल चळवळीला बळकटी मिळणार, असे जाणकार सांगतात.

नक्षल चळवळीत अंतर्गत संघर्ष

नक्षलवाद्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सुरक्षादलांच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. एप्रिल २०२५ मधील “ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट”मध्ये करेगुट्टा टेकड्यांवर ३१ माओवादी ठार झाले. त्यानंतर मे २०२५ मधील अबुझमाडातील चकमकीत वरिष्ठ नेता नंबाला केशवा राव (बसवराज) मारला गेला. यानंतर नक्षलचळवळीत तेलुगु आणि आदिवासी असा अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. चळवळीत कार्यरत तेलुगू सदस्यांना मूळ राज्यात परतण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे.

हिडमा हा आदिवासी समाजातून येतो. सोबतच त्याचा विचारधारेपेक्षा हिंसक कारवायांकडे अधिक कल असतो. यामुळे चळवळीतील काही वरिष्ठ नेते हिडमापासून विशिष्ट अंतर बाळगतात. मधल्या काळात पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे चळवळ कमकुवत झाली असली तरी हिडमा नेतृत्व करीत असलेले बटालियन क्र. १ अद्याप कायम आहे. यात १८० हून अधिक सशस्त्र सदस्य आहे. हे सर्व सदस्य युद्धनीतीत निष्णात असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रदेखील आहे.

आदिवासी नेतृत्वाला प्रोत्साहन

हिडमाची नेमणूक तेलुगू तक्कलपल्ली वासुदेव राव (आशन्ना) यांला डावलून केल्या गेली आहे. त्यामुळे चळवळीत सक्रिय आदिवासी सदस्यांना नवे बळ मिळाल्याचे बोलल्या जात आहे. यापूर्वी प्रमुख आणि निर्णय प्रक्रियेत तेलुगु नेत्यांचे वर्चस्व होते. आदिवासी सदस्यांना तळपातळीवर सैनिक म्हणून ठेवण्यात येत होत्र. यामुळे आदिवासी गटात नाराजी होती. आता हिडमाच्या नेतृत्वामुळे या गटाला आत्मविश्वास मिळाल्याचे दिसून येते. दुसरीकडे या निर्णयामुळे तेलुगू आणि आदिवासी नेत्यांमध्ये अंतर्गत तणाव वाढला आहे.

हिडमाची पार्श्वभूमी

दक्षिण बस्तर भागातल्या सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावातील रहिवासी असलेला माडवी हिडमाने १९९६-९७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नक्षल चळवळीत प्रवेश केला. त्याला चळवळीत हिदमाल्लू आणि संतोष या दोन नावांनी ओळखल्या जाते.

नक्षल चळवळीत सामील होण्यापूर्वी हिडमा गावात शेती करायचा. त्याभागातील नागरिक म्हणतात की, तो मितभाषी आहे. त्याला नवनव्या गोष्टी शिकायला आवडतात. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हिडमाला हिंदीसह इंग्रजी भाषेचेही ज्ञान असल्याचे बोलल्या जाते. २००० साली त्याला शस्त्र बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यादरम्यान बजावलेल्या कामगिरीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. २००१-०२ च्या आसपास हिडमाला दक्षिण बस्तर जिल्हा तुकडीत पाठविण्यात आले. त्यानंतर तो नक्षलवाद्यांची सशस्त्र तुकडी ‘पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी’मध्ये सहभागी झाला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार २००१ ते २००७ पर्यंत नक्षल चळवळीत हिडमा एक सामान्य सदस्य होता. बस्तरमधील सलवा जुडून मोहिमेनंतर तो अधिक आक्रमक झाला.

२००७ साली बस्तरमधील उरपल मेट्टा चकमकीत २४ पोलीस जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याचे नेतृत्व हिडमाने केले होते. समोरासमोरच्या लढाईत नियोजनबद्द पद्धतीने हल्ला करण्याची रणनीती हिडमामुळे अधिक बळकट झाल्याचे जाणकार सांगतात. याच कामगिरीमुळे त्याला २००८ -०९ मध्ये नक्षलवाद्यांच्या पहिल्या बटालियनचा कमांडर बनविण्यात आले. २०१० साली ताडमेटलामध्ये झालेल्या चकमकीत ७६ जवान शहीद झाले होते. यातही हिडमाने प्रमुख भूमिका बजावली होती. यानंतर २०११ मध्ये त्याला दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा सदस्य म्हणून बढती देण्यात आली. दंडकारण्याच्या दुर्गम जंगलांचा भौगोलिक अभ्यास व त्याच्या युक्तीमुळे तो सुरक्षादलांसाठी कायम डोकेदुखी ठरत आला आहे.