अकोला : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती विसर्जन करून येत असताना गणेश भक्तांचा मोठा अपघात झाला आहे. मोटारीने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोला- पातूर मार्गावर घडली. अनंत चतुर्दशीला भाविक-भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गणेश विसर्जन मिरवणूक हा अकोल्याचा एक सांस्कृतिक ठेवा बनला आहे. मिरवणुकीची शतकोत्तर परंपरा आजही अबाधित ठेवली. विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. दरम्यान, जिल्ह्यात अकोला – पातूर मार्गावर गणेश भक्तांवर काळाने घाला घातला. गणेश विसर्जन करून परत येणाऱ्या भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

शहरातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी गणपती विसर्जनासाठी कापशी येथे गेले होते. जय बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे कापशी तलावावर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करून परत येत असताना दुचाकीचा अपघात झाला. मृत पावलेला तरुण आणि जखमी तरुण, असे चौघे जण एकाच दुचाकीवरून प्रवास करीत होते. त्यावेळी भरधाव दुचाकीला मोटारीने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. मोटारीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये रामचरण अंधारे यांचा मृत्यू झाला असून राहुल खोंड, विनोद डांगे, विक्की माळी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमी तरुणांवर उपचार केले जात आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा ‘प्रहार’

जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबविण्यात येत आहे. पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे यांना पेट्रोलिंगदरम्यान दोन व्यक्ती दुचाकीवरून देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पिंजर पोलिसांनी छापा टाकून २६ हजारांची दारू व दुचाकी असा एकूण एक लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अमर उद्धव घोडे (वय २८ वर्ष, रा. टेंभी), जनार्धन तुकाराम खंडारे (वय ७० वर्ष रा. विरहित) यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहे. अवैध व्यवसायाविरुद्ध जिल्ह्यात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू करून कारवाईचे सत्र राबवले जात आहे.