३२ हजार मोकळे भूखंड ‘कचराघर’! 

शहरातील १ लाख ३८ हजार ८७० मोकळे भूखंड असून त्यापैकी ३२ हजार भूखंडावर कचऱ्याचे  साम्राज्य आहे.

डेंग्यू नियंत्रणात कसा येणार?

राम भाकरे, लोकसत्ता

नागपूर : सध्या नागपुरात डेंग्यूची साथ सातत्याने वाढत असताना शहरात स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. खुल्या भूखंडांवर साचणारा कचरा ही पावसाळ्यातील गंभीर समस्या आहे. शहरातील १ लाख ३८ हजार ८७० मोकळे भूखंड असून त्यापैकी ३२ हजार भूखंडावर कचऱ्याचे  साम्राज्य आहे.

करोनाची साथ नियंत्रणात आली असली तरी डेंग्यूने तोंड वर काढले आहे. दररोज ही संख्या वाढत चालली आहे. साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. तसेच ठिकठिकाणी साचलेला कचराही रोगाची साथ पसरण्यास पोषक ठरतो.

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिकेची आहे. ती घराघरातून कचरा उलचते. पण सार्वजनिक ठिकाणी साचणारा कचरा ही सध्या मोठी समस्या आहे. मोकळ्या भूखंडावर लोक कचरा टाकतात. तो नियमित उचलला जात नाही. तो अनेक दिवस तसाच पडून राहतो, पाऊस पडल्यावर तो भिजला की त्यातून दुर्गंधी सुटते,  डास वाढतात. शहरात  एकूण १ लाख ३८ हजार ८७० मोकळे भूखंड आहेत. त्यापैकी सर्वाधिक आशीनगर झोनमध्ये ३६ हजार ४०९, नेहरूनगर झोनमध्ये २६ हजार ४९, गांधीबाग ४९५  भूखंड आहेत. यापैकी तब्बल ३२ हजार मोकळे भूखंड सध्या कचराघर झाले आहेत.

डेंग्यू नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने कोरडा दिवस पाळण्याचे नागरिकांना आवाहन केले. नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये, असे सांगण्यात आले. बुधवारी यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात ८०४२ घराची तपासणी करण्यात आली असता ३७८ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. यावरून नागरिकांमध्येही डेंग्यूविषयी काळजी घेतली जात नसल्याचे स्पष्ट होते.

मोकळ्या भूखंडांवर कचरा साचू नये याची काळजी मालकांनाच घ्यायची आहे, कचरा साचला असेल तर त्यावर कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षांत केवळ १२११ भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर २१०० भूखंडांना नोटीस  बजावण्यात आली आहे.  विशेष म्हणजे, ३२ हजारापैकी शहरातील ७४० भूखंड कोणाच्या मालकीचे आहे याची नोंद महापालिकेत नसल्याचे समोर आले आहे.

झोन    –     खुले भूखंड

लक्ष्मीनगर –    ११३७५

धरमपेठ –       ६७३५

हनुमाननगर  –   १७,१७७

धंतोली  –          ५६३

नेहरूनगर  –      २६२७४

गांधीबाग  –       ५१९

सतरंजीपुरा  –  ३८९०

लकडगंज –  २०१६८

आशीनगर –  ३६४६१

मंगळवारी –  १०७०८

४१६ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या

शहरातील विविध डेंग्यूची वाढती संख्या बघता महापालिकेने दैनंदिन झोननिहाय सर्वेक्षण करणे सुरू के ले आहे. त्यानुसार बुधवारी शहरात ७ हजार ९७९ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१६ घरामध्ये डेंग्यू अळी आढळून आली.  २५० जणांच्या रक्ताचे  तर १३ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. मंगळवारी ८ हजार २४ घराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणादरम्यान ३०२९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८१ कुलर्समध्ये डेंग्यूचे डास आढळले. २०६ कुलर्समध्ये गप्पी मासे सुद्धा टाकण्यात आले. गुरुवारी सतरंजीपुरा झोन येथे आयुक्त राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी डेंग्यू उपाययोजनेचा आढावा घेतला.

बांधकामस्थळी प्रतिबंधक उपाय करा- विभागीय आयुक्त

शहर व जिल्ह्य़ात डेंग्यू व मलेरियाची वाढती साथ लक्षात घेता बांधकाम स्थळी पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. आयुक्त कार्यालयात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व विविध बांधकाम संघटनांच्या प्रतिनिधी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. दीपाली नासरे यांची बैठक झाली. शहरात सुमारे सहाशे ठिकाणी इमारत तर काही ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. तेथे पावसाचे पाणी  साचत असल्यामुळे तेथून डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणावर होते. बांधकाम स्थळावरील डास उत्पत्तीस्थळे नष्ट करावी, मोकळ्या भूखंडांची तपासणी करावी. या ठिकाणी करावी, कायमस्वरुपी पाणी साचत असल्यास तिथे गप्पी मासे सोडून डासाची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, आदी सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. बैठकीला क्रेडाईचे अध्यक्ष संतदास चावला, माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव गौरव अग्रवाल, कोषाध्यक्ष राजमोहन साहू इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नगरारे आणि कोषाध्यक्ष पुरुषोत्तम हरडे उपस्थित होते.

१५ दिवसात १७७ रुग्ण

शहरात मागील १५ दिवसात १७७ रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण धरमपेठ व सतरंजीपुरा झोनमध्ये आहेत, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. शहर व परिसरात ६०० ठिकाणी बांधकाम सुरु असून क्रेडाईच्या माध्यमातून या सर्व जागांवर डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यात येत आहे, असे प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी यांनी स्पष्ट  केले.

कचरा साचलेल्या  मोकळ्या भूखंडावर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत १२००च्यावर  भूखंड मालकांवर दंडात्मक तर अडीच हजाराहून अधिक भूखंड मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

– डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (घनकचरा)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Garbage dump on 32000 vacant plots in nagpur zws