नागपूरः शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागांत हत्तीरोगाचे ४ हजार ८८२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे १०० रुग्णांच्या हातात हत्तीरोगाचे जंतू आहेत. या सगळ्या रुग्णांवर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागातील हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शहरात हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. नागपूरच्या शहरी भागात १५ अंडवृद्धीचे आणि हत्तीरोगाचे ९८५ असे एकूण १ हजार रुग्ण आहेत. ग्रामीणला अंडवृद्धीचे ७४५ आणि हत्तीरोगाचे ३ हजार ८९७ असे एकूण ४ हजार ६४२ रुग्ण आहेत.

हेही वाचा – नागपूर: सहलीला गेलेले चौघे कन्हान नदीत बुडाले

जिल्ह्यातील या सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाकडून नि:शुल्क औषधोपचार व अंडवृद्धीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. सहसा हा आजार पायात आढळतो. परंतु जिल्ह्यातील शंभर रुग्णांच्या हातात या आजाराचे जंतू आढळले असून त्यांचे हात सुजलेले आहेत. त्यावरही उपचार सुरू आहे. भिवापूर परिसरात हे रुग्ण अधिक आहेत. दरम्यान, हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत नागपूर महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या मोहिमेचा शुभारंभ केला गेला. त्याअंतर्गत १७ ऑगस्टला मांढळ येथील लेमदेव पाटील महाविद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी स्वत: हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन केले. नागपूर महापालिका हद्दीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोहिमेचा शुभारंभ केला. नागरिकांनीही गोळ्यांचे सेवन करून हा आजार दूर करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी वणवण!; पुरेशा कागदपत्रांअभावी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रवेशाची अडचण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्तीरोग म्हणजे काय?

हत्तीरोग हा डासाने चावल्याने प्रसारित होणारा रोग आहे. त्याला हत्तीपाय म्हणूनही ओळखले जाते. या आजारात हातापायावर सुज व वृषणदाह (अंडवृद्धी) दिसते. कोणत्याही व्यक्तीस संक्रमणानंतर आजार समोर यायला ५ ते १५ वर्षे इतका कालावधी लागू शकतो.