नागपूर : नाशिकचे पालकमंत्री कोण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा,असा सल्ला जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांचे दिल्लाीतील भाजप नेत्यांशी थेट संबंध आहेत, मी त्या तुलनेत लहान कार्यकर्ता आहेत, अशी कोपरखळी त्यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर मारली.
कुंभमेळ्याच्या संदर्भात रविवारी नागपुरात बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीला उपस्थित होते. कुंभ मेळाच्या तयारीचे काम महाजन यांच्याकडे आहे. त्यामुळे तेही बैठकीत उपस्थित होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत विचारणा केली असता महाजन म्हणाले, मुख्यमंत्री आज नागपुरात आहेत. पालकमंत्र्यांसंदर्भात त्यानाच तुम्ही विचारावे.
मी कुंभमेळ्याच्या तयारीचे काम करीत आहे, हिंदी सक्तीच्या संदर्भात त्यांना विचारले असता याबाबत मुख्यमंत्री बोलतील असे ते म्हणाले. सजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणाले की, स्वप्न सर्वच जण बघू शकतात. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील,असे त्यांना वाटते.असे ते म्हणाले.
यावेळी महाजन यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाविषयी माहिती दिली. कुंभमेळ्याला यावेळी अधिक गर्दी होईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे प्रस्तावित आहे. नाशिककडे येणाऱ्या महामार्गाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासोबतच यात्रेकरूंसाठी सोयी सुविधाही उपलब्ध क रून देण्यात येणार आहे.
खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता महाजन म्हणाले, खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्याचे थेट दिल्लीतील नेत्यांशी कनेक्शन आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. बडगुजर यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ते भाजपमध्ये येण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसून येते.