scorecardresearch

…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा

बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने पालकांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा
प्रतिनिधिक छायाचित्र

अकोला: करोना काळात पश्चिम बंगालमधून हरवलेली १७ वर्षीय मुलगी अकोल्यातील रेल्वेस्थानकावर आढळली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्या मुलीची पालकांसोबत भेट घडून आली. बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने पालकांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

अकोला रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांना २०२० मध्ये टाळेबंदीदरम्यान एक १७ वर्षीय मुलगी विनापालक आढळून आली. त्या मुलीची भाषा बंगाली असल्यामुळे पोलिसांना तिचे बोलणे कळत नव्हते. मुलीच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तिला बालकल्याण समितीच्या आदेशाने आनंद बालिकाश्रम येथे दाखल करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर यांनी बंगाली भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीला त्या मुलीशी वार्तालाप करण्यासाठी पाचारण केले. आनंद बालिकाश्रमच्या अधीक्षिका तपोधीरा दीदी यांच्या समक्ष मुलीने दोन ते तीन वेळा वार्तालाप केला. तिने दिलेल्या माहितीनुसार गावांचा शोध ‘गुगल’द्वारे घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आणि बालकल्याण समितीने शोध मोहीम राबवली.

हेही वाचा >>> देव तारी त्याला कोण मारी! वाघाने दुचाकीवर झडप घेतली अन्…

पश्चिम बंगालमधील त्या मुलीच्या गावातील पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांशी संपर्क साधण्यात आला. त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून मुलीचे संभाषण करून देण्यात आले. तेथील पोलिसांनी त्या मुलीच्या कुटुंबाचा शोध घेतला. बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. अनिता गुरव आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर, पोलीस निरीक्षक मनोज महतो व बालिकेचे पालक यांच्यात नियमित संपर्कात होते. समिती सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे, ॲड. शीला तोष्णीवाल, आनंद बालिकाश्रमच्या तपोधीरा दीदी व पोलीस निरीक्षक मनोज महतो यांच्या प्रयत्नातून एका हरवलेल्या मुलीला पुन्हा पालकत्व प्राप्त झाले. त्या मुलीचे पालक पश्चिम बंगालच्या पोलिसांसह अकोल्यात दाखल दाखल झाले. कागदपत्रांची पडताळणी करून त्या मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर मुलीची पालकांसोबत भेट घडून आल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:33 IST

संबंधित बातम्या