नागपूर: नागपूरसह राज्यात सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. २१ मार्चला हे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम चक्क ६७ हजार ३०० रुपये नोंदवले गेले होते. या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे होळीच्या तोंडावर शनिवारी (२३ मार्च) नागपुरात सोन्याचे दर ६६ हजार ४०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले.

नागपूरसह राज्यात दीड महिन्यांपासून सातत्याने सोन्याचा दरात मोठी वाढ होतांना दिसत आहे. बघता बघता २४ कॅरेट सोन्याचे दर नागपुरात २१ मार्च २०२४ रोजी प्रति दहा ग्रामसाठी ६७ हजार ३०० रुपयेपर्यंत पोहचले होते. या दिवशी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २२ कॅरेटसाठी ६२ हजार ६००, १८ कॅरेटसाठी ५२ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४३ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७६ हजार रुपये होते.

हेही वाचा…महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट अपघात ! मुंबई, पुण्यात सर्वाधिक मृत्यू

दरम्यान या दिवसानंतर हळू- हळू सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे नागपुरात शनिवारी (२३ मार्च) सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६६ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटचे दर ६१ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४३ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे २१ मार्चच्या तुलनेत २३ मार्चला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९०० रुपये, २२ कॅरेटचे दर ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे लग्न समारंभासह इतर कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने घेणाऱ्याना दिलासा मिळाला आहे.