गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात सालेकसा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम पुराडा येथे रविवार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. अंदाजे ८:०० वाजे दरम्यान गावातील शेत शिवारात असलेल्या गदाई बोडीतील पाण्यात तीन तरुणांचा बुडून करुण अंत झाल्याची हृदय द्रावक घटना घडली. या घटनेमुळे ग्राम पुराडा तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आदित्य सुनील बैस (वय १५), तुषार मनोज राऊत (वय १७) दोन्ही राहणार गडेवारटोला/पुराडा तसेच अभिषेक रामचरण आचले (वय २१) रा. पुराडा ता. देवरी जि. गोंदिया असे या घटनेतील मृतक तरुणांचे नाव आहे. सालेकसा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. घटनेची माहिती सालेकसा पोलीस स्टेशन येथे कळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतकांमध्ये दोन विद्यार्थी पूर्ण गावातील असल्याने पुराडा गाव परिसरात शोककळा पसरलेली आहे. आदित्य सुनील बैस हा नूतन विद्यालय पुराडा येथील दहाव्या वर्गामध्ये शिकत होता तर तुषार मनोज राऊत हा विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा पुराडा येथे १२ व्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. तर अभिषेक घरच्या कामाला हातभार लावण्याचा काम करीत होता.
पुराडा गावात राहणाऱ्या आचले कुटुंबात रविवार ५ ऑक्टोबर रोजी मुलाचा साखरपुडा चा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सायंकाळच्या सुमारास गावकरी तसेच मित्रमंडळी जेवण करायला आले होते. जेवण केल्यानंतर परिसरात हे तिघेही तरुण दुचाकीने फिरत असताना गावकऱ्यांना लक्षात आले होते. मात्र इकडे कार्यक्रम आटोपल्या नंतर ही मुले लवकर घरी न पोहोचल्याने कुटुंबातील व्यक्तींनी यांचा शोध सुरू केला होता.
दरम्यान पुराडा शेतशिवारात असलेल्या गदाई बोडी नजीक यांची दुचाकी आढळली. त्यामुळे गावकऱ्यांनी बोडीजवळ जाऊन पाहणी केली असता, बोडीतील पाण्याच्या तीरावर एक छत्री आणि या तरुणांचे चप्पल , बूट आढळून आले. याची माहिती गावात होताच, गावकऱ्यांनी बोडीकडे धाव घेतली. आणि मध्यरात्री रात्री अंदाजे १:३० वाजे दरम्यान या तिघा तरुण मृतकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मृत तिघेही युवक पुराडा येथील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये पोहायला गेल्याची माहिती आहे. पण बोडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, तीन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून ही घटना अपघात की घातपाताची अशा चर्चा रंगल्या आहे. घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या पुराडा गावातील एका बोडीत तीन तरुणाचा रविवारी सायंकाळच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला. एक तरुण बुडत असताना त्यालावाचविण्याच्या नादात दुसरा आणि तिसरा ही बुडाला असल्याची शक्यता दिसून येत आहे. – भूषण बुराडे, पोलीस निरीक्षक , सालेकसा जि. गोंदिया