गोंदिया : लहान भावाचा लग्न सोहळा…रात्रीच्या हळदी कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबीय व नातेवाईक सहभागी होवून आनंद साजरा करीत होते. दरम्यान कार्यक्रमात डी.जे. च्या तालावर नाचत असताना अचानक वराच्या मोठ्या भावाला भोवळ येऊन तो खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने आनंदाचे क्षण दु:खात बदलले. ही घटना रविवार, ४ मे रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे घडली. नेतराम सिताराम भोयर (४०) असे मृतक मोठ्या भावाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नेतराम भोयर यांच्या लहान भावाचे ५ मे रोजी लग्न होते. त्यामुळे भोयर यांच्या घरी रविवारी (दि.४) हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमात संपूर्ण भोयर कुटुंबीय व्यस्त होते. साेमवारी विवाह असल्याने घरी वऱ्हाडी मंडळी सुध्दा आली होती. सर्व कुटुंबीय मिळून रात्री ११:३० वाजता हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. यात नाचत असलेले नेतराम भोयर हे अचानक भोवळ येऊन पडले.
यानंतर कुटुंबीयांची धावपळ सुरु झाली.लगेच गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून नेतराम भोयर यांना मृत घोषीत केले.आणि क्षणातच लग्न मंडपी शोककळा पसरली. त्यानंतर या घटनेची माहिती सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळे विवाह सोहळा असलेल्या भोयर कुटुंबीयावर दुख:चे डोंगर कोसळले.
नवरदेव लग्न मंडपात जाण्याआधीच मोठ्या भावाचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्याची वेळ विवाह असलेल्या लहान भावावर आली. या घटनेमुळे संपूर्ण चिखली गाव हळहळले. नेतराम भोयर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन भाऊ, आई, वडील असा आप्त परिवार आहे. डूग्गीपार पोलिसांना या प्रकरणाची नोंद केली असून मर्ग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी दिली.
गोबरवाही शाळेत शिक्षक
नेतराम भोयर हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गोबरवाही येथील जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. लहान भावाचे लग्न असल्याने ते सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे कुटुंबासह आले होते. सोमवारी विवाह सोहळा असल्याने संपूर्ण भोयर कुटुंबीय आनंदात होते. मात्र नेतराम भोयर यांचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना मृत्यू झाल्याने भोयर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला.
दोन मुली झाल्या पोरक्या…
शिक्षक नेतराम भोयर यांना दोन लहान मुली आहेत. अश्या प्रकारे वडीलांच्या अकाली मृत्यूने दोन मुली वडीलाच्या प्रेमाला पोरक्या झाल्या आहेत. तर मोठ्या मुलाच्या मृत्यूने भोयर कुटुंबीयांचा आधारवड ही हरविला आहे.