नागपूर : सरकारी धान्य तस्करीतील आर्थिक वादातून कुख्यात गुंड राजा गौसची क्रुरता उघडकीस आली आहे. गौसने त्याच्या व्यावसायिक भागीदाराचेच अपहरण करत त्याला विवस्त्र केले. त्याचा प्रचंड छळ करत ‘स्क्रू-ड्रायव्हर’ने त्याचे दात उपटले. या प्रकरणात पोलिसांनी राजा गौस आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली. इतरांचा शोध सरू केला आहे.
मोहम्मद आरीफ मोहम्मद इब्राहीम अंसारी (५३) असे पीडित भागीदाराचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि राजा गौर यांचा सरकारी धान्य तस्करीचा व्यवसाय नंदनवन परिसरातून चालवत होते. या व्यवसायात राजा गौस वल्द वारीस अली आणि सलीम साजीद खान (४८) यांनी गुंतवणूक केली होती. पैशांच्या वाटपावरून राजा गौसचा आरीफसोबत वाद सुरू होता. या वादात राजा गौस फिर्यादीकडून ७ लाख रुपयांची मागणी करत होता.
१८ मे रोजी संध्याकाळी राजा गौस आठ-दहा साथीदारांसह वाठोडा परिसरातील आरीफच्या घरी पोहोचला. तेथून त्याने बंदुकीच्या धाकावर त्याचे अपहरण केले व नंदनवन पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या त्याच्याच धान्य गोदामात नेले. तेथे आरीफला विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर, आरोपी त्याला मानकापूर परिसरातील एका घरात घेऊन गेले. येथे त्याला बेडला बांधून पाच तास त्याचा अमानुष छळ केला गेला. आरोपींनी यावेळी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी आरीफचे दात स्क्रूड्रायव्हरने उपटले, काठ्यांनी मारहाण केली, ज्यामुळे तो बेशुद्ध होण्याच्या मार्गावर पोहोचला. त्यानंतरही आरोपींनी मलमुत्र त्याच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी त्याच्या तोंडावर लघुशंकाही केली. ही अत्याचाराची मालिका सलग पाच तास सुरू होती. अखेर रात्री उशिरा आरीफला सोडण्यात आले. या क्रूर घटनेनंतरही आरीफने धाडस करून वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाठोडा पोलीस आणि गुन्हे शाखेनेही घटनेचे गांभीर्य बघत छापा टाकून राजा गौस व त्याचा साथीदार सलीम खान ऊर्फ मामू यांना अटक केली. या प्रकरणात राजा गौस व त्याच्या साथीदारांवर अपहरण, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
वर्षभरापूर्वीच कारागृहातून सुटका
कुख्यात गुंड राजा गौस यावर विविध गंभीर गुन्ह्यासह नागपूरमधील तुरुंग फोडण्याच्या घटनेचा गुन्हा दाखल आहे. वर्षभरापूर्वीच तो तुरुंगातून सुटला होता. आता पुन्हा क्रूरतेची सीमा गाठणारे कृत्य त्याने केले आहे.