आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. एकीकडे उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच निकाल लागले. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील बऱ्याच गावांमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या पॅनलचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मेंढेपठार (बाजार) या गावातील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत मोठा बदल घडवला आहे.

मेंढेपठार ग्रामपंचायतीवर तब्बल ६५ वर्षांपासून असलेली चिखले कुटुंबीयांची सत्ता यंदा गावकऱ्यांनी संपुष्टात आणली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर नामदेवराव चिखले यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायतीतील सरपचांसह आठही जागा युवा ग्राम विकास परिवर्तन पॅनलने जिंकत चिखलेंना सत्तेवरून खाली खेचलं आहे. युवा परिवर्तन पॅनलने भाजपाच्या पाठिंब्याने यंदाची निवडणूक लढवली होती.

mendhepathar nikal
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक काटोल तालुका, जिल्हा नागपूर

तब्बल ६५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या चिखले पॅनलचा युवा परिवर्तन पॅनलने ८-०ने पराभव केला. चिखले पॅनलला एकही जागा जिंकला आलेली नाही. मेंढेपठार गावात इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच निवडणूक एकतर्फी झाली. “गावातील इतक्या वर्षांची एकाच कुटुंबाची सत्ता संपुष्टात आणल्याचा आपल्याला आनंद आहे. आपण ही निवडणूक भाजपाच्या पाठिंब्याने लढवली होती,” अशी माहिती मेंढेपठारचे नवनिर्वाचित सरपंच अभय कोहळे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, युवा परिवर्तन पॅनलकडून सरपंच पदासाठी अभय नामदेव कोहळे रिंगणात होते. तर, डोमा पुंडलिक सर्याम, ज्योत्सना काकडे, आकाश रविंद्र सोमकुवर, वनिता सुधाकर हेलोंडे, अंजु कांतेश्वर, उर्मिला शिरपूरकर आणि अरुणा गजभिये या सर्वांनी सदस्यपदासाठी निवडणूक लढवली होती. या सर्व सदस्यांचा निवडणुकीत विजय झाला आहे.