लोकसत्ता टीम

अमरावती: कार्यालयीन तसेच मित्रांच्‍या व्‍हॉट्स ॲप समूहावर पत्र पाठवून एका ग्रामसेवकाने गळफास लावून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गापूर येथील हनुमान मंदिराच्‍या परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्‍या स्थितीत या ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आला. त्‍याचे पत्र समाजमाध्‍यमावर प्रसारीत झाले आहे.

चेतन गोपीचंद राठोड (४०, रा. शदानी नगर, अकोली रोड) असे आत्‍महत्‍या करणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे. चेतन राठोड हे नांदगाव खंडेश्‍वर पंचायत समिती अंतर्गत जावरा भगुरा येथे ग्रामसेवक म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी आणि मुलगा आहे. दुर्गापूर येथील हनुमान मंदिराच्‍या परिसरात त्‍यांची एमएच २९ / बीसी ४७८४ क्रमांकाची कार आढळून आली. मृत्‍यूपुर्वी मित्रांच्‍या तसेच कार्यालयातील सहकाऱ्यांच्‍या व्‍हॉट्स ॲप समूहावर त्‍यांनी हृदयस्‍पर्शी पत्र पाठवून आपली जीवनयात्रा संपविली.

आणखी वाचा- बुलढाणा : आघाडी विरुद्ध भाजपा-शिंदे गटात थेट लढत, बाजार समितीच्या १८० जागांसाठी ४५० उमेदवार रिंगणात

घरकुलांच्‍या प्रकरणात अंकेक्षणाच्‍या वेळी कागदपत्रे सादर करता न आल्‍याने आपल्‍यावर २९ लाख रुपयांची ‘रिकव्‍हरी’ काढण्‍यात आली. घरकुलाचे पैसे लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यांमध्‍ये जमा झालेले होते. तरीही विनाकारण आपल्‍यावर ठपका ठेवून सेवेतून कमी करण्‍यात आले. आपल्‍याला वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी कुठल्‍याही प्रकारचे मार्गदर्शन केले नाही, असाही आरोप चेतन राठोड यांनी पत्रात केला आहे.

आपण आता कर्ज काढून घर बांधले आहे. त्‍याची परतफेड करावी लागणार आहे. त्‍यामुळे राज्‍यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी माझ्या कुटुंबाला प्रत्‍येकी १ हजार रुपये द्यावे, जेणेकरून ते उघड्यावर येणार नाहीत, असे कळकळीचे आवाहन चेतन राठोड यांनी पत्रातून केले आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी ग्रामसेवक संघटनेच्‍या अध्‍यक्षांना केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘प्रिय पत्‍नी आणि माझ्यावर जीव लावणारे सर्व मित्र मैत्रीण यांना माझा शेवटचा राम राम’ असे लिहून त्यांनी आपले जीवन संपवले. मात्र, या आत्महत्येला नेमके कोण जबाबदार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.