पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : मेडिकल, सुपरस्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने गेल्या अडीच वर्षांत यंत्र, औषध, साहित्यांची खरेदी करण्यासाठी हाफकीनकडे ६१ कोटी रुपये वळते केले. परंतु त्यातील केवळ चार कोटींचे यंत्र वगळता इतर खरेदी झालीच नाही. हा प्रकार आज मंगळवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिकलमध्ये घेतलेल्या बैठकीत समोर येताच पालकमंत्र्यांनी भ्रमणध्वनीवरच हाफकीनच्या अधिकाऱ्यांना सुनावले व तातडीने खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

यावेळी आमदार पंकज भोयर उपस्थित होते. शासनाच्या आदेशानुसार, सर्वच खात्याच्या शासकीय रुग्णालयांतील यंत्र, औषधांसह सर्जिकल साहित्याची खरेदी हाफकीनकडूनच केली जाते. मेडिकल, सुपरस्पेशालिटी प्रशासनाने गेल्या अडीच वर्षांत कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या यंत्रासाठी मिळालेल्या २० कोटी रुपयांसह इतर खरेदीसाठी मिळालेले एकूण ६१ कोटी रुपये हाफकीनकडे वळते केले. त्यातून मेडिकलमधील डीएसए, १३ व्हेंटिलेटरसह, एक यंत्र आणि सुपरस्पेशालिटीतील काही यंत्र असे चार कोटींचे यंत्र वगळता इतर खरेदी झाली नाही. याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे या बैठकीत पुढे आले. त्यावर पालकमंत्र्यांनी हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालकांना भ्रमणध्वनीवरून खरेदी होणार कधी, हा प्रश्न उपस्थित करत खडसावले. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. अशोक मदान, सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासह सर्वच विभागप्रमुखांकडून त्यांनी माहिती घेतली. वैद्यकीय शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या विषयावर त्यांनी वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्याशीही भ्रमणध्वनीवर चर्चा केली.

मेडिकल सौरऊर्जेवर येणार

मेडिकलचे महिन्याचे वीज देयक ४५ लाख रुपये इतके येते. ते वर्षांला अडीच कोटी होतात. हा पैसा वाचवण्यासाठी  महाऊर्जाकडून सौर प्रकल्पाचा प्रस्ताव देऊन हे महाविद्यालय व रुग्णालय सौर ऊर्जेवर आणण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister chandrasekhar bawankule meeting in medical zws
First published on: 07-08-2019 at 04:31 IST