भंडारा : भंडाऱ्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचा कडा वाहून गेल्याने महामार्गाच्या निकृष्ट कामाच्या चर्चांना उधाण आले आहे. भंडारा शहरालगत मुंबई-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ६५० कोटी रुपयांच्या खर्चातून १५ किलोमीटरच्या बायपासची निर्मिती करण्यात आली. मात्र, मागील २४ तासांपासून भंडारा जिल्ह्यात आलेल्या पहिल्याचं जोरदार पावसात या बायपास महामार्गाच्या सुरक्षेकरिता बाधण्यात आलेल्या कडा वाहून गेल्या. या सिमेंटच्या कडा वाहून गेल्यानं त्याखालील मातीही आता पाण्यासोबत बाहेर निघायला सुरुवात झाली. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि चारचाकी वाहनांची वाहतूक असते. उल्लेखनीय म्हणजे या महामार्गावर पाणी साचल्याने दुचाकी स्लीप होऊन काल दोन तरुणांनी प्राण गमावले.

भंडारा शहराला छेदून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवीन बायपास मार्गाला मंजुरी देण्यात आली.
नवीन बायपाससाठी तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर २०२० मध्ये गडकरी यांनी कामाला मंजुरी दिली. सहापदरी असलेल्या या बायपासची लांबी १४ किलोमीटर असून यासाठी ५६.८९ हेक्टर जमीन आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी अशा १३ गावांमधून संपादित करण्यात आली आहे.६१८.७५ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या बायपासचे काम अंतिम टप्प्यात आहे.

विशेष म्हणजे, भंडारा शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता हा बायपास उद्घाटनापूर्वीचं सुरू करण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला या बायपास महामार्गावरील कडा उद्घाटनापूर्वीचं पावसामुळे घसरल्यात आणि महामार्गावर भरण केलेली मातीही हळूहळू निसरडू लागल्याने याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानंतर दिवसभर त्यावर मलमपट्टी करण्याचे काम सुरू होते.

अंडरपास नसल्याने गावांना जाण्यासाठी वळसा…

कोट्यवधी रुपये खर्च करूनही या बायपासचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि आता त्याच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मार्गाच्या बांधकामात झालेल्या अनेक तांत्रिक चुकांमुळे या मार्गाने जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बायपास रस्त्यावर अशोकनगर, फुलमोगरा, कोरंबी, कारधा, भिलेवाडा, पलाडी येथे पूल बांधण्यात आले. परंतु पलाडीकडे जाण्यासाठी एकही अंडरपास शिल्लक राहिलेला नाही, ज्यामुळे गावकऱ्यांना गावाकडे जाण्यासाठी दोन किलोमीटरचा लांब वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. भिलेवाडा, कारधा, कोरंबी, अशोकनगर येथे झालेल्या ओव्हरब्रिजचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ये-जा करण्यात मोठ्या अडचणी येतात.

डीपीआरनुसार बांधकाम नाही….

या बायपासचे बांधकाम डीपीआरनुसार नाही. त्यामुळे पुलावर पाणी साचत आहे. गोसीखुर्द आणि पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय वैनगंगा नदीच्या काठावर ओव्हर ब्रिजचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आले. पलाडी, कोका गावातील नागरिकांना सिंगोरी फाटा येथून एक किलोमीटर चालत जावे लागते. तर भंडारा येथे पोहोचण्यासाठी दोन किलोमीटर लागतात. ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करूनही, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी पलाडी क्रॉसिंगवर वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी बायपासच्या निकृष्ट बांधकामाला जबाबदार धरले आणि पलाडी क्रॉसिंगवर लवकरात लवकर ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिशाभूल करणारे सूचना फलक…

विशेष म्हणजे या मार्गावरील सूचना फलक हे दिशादर्शक नसून दिशाभूल करणारे आहेत. हा भंडारा बायपास असताना सूचना फलकावर भंडारा बायपास असा उल्लेखच नाही. याउलट गिरोला कारधा असे फलक लागले आहे. रस्त्याच्या मधोमध कोका वन्यजीव अभयारण्य नवेगाव नागझिरा असे फलक आहे मात्र कोक्यासाठी वळण कुठून घ्यायचे याबद्दल कोणताही सूचना फलक नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकृष्ट दर्जाचे काम खासदारांचा आरोप…

१० जून रोजी, खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत परिसरातील ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या एनएचएआय अधिकारी पी.डी. सिन्हा यांच्यासमोर मांडल्या होत्या. समस्या ऐकल्यानंतर, खासदार प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्याला फटकारले आणि ग्रामस्थांच्या ये-जा करण्यासाठी तात्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. खासदार डॉ. पडोळे म्हणाले की, भिलवाडा, कारधा, कोरंबी, अशोकनगर येथे झालेल्या ओव्हरब्रिजचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ये-जा करण्यात मोठ्या अडचणी येतात