यवतमाळ : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उमरखेड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पैनगंगेच्या वाढत्या पातळीमुळे तालुक्यातील पळशी गावाला सोमवारी दुपारपासून पुराचा वेढा पडला आहे. सध्या पाणी उतरत असले तरी पुराचा धोका कायम आहे.
ईसापूर धरणाच्या वाढत्या विसर्गामुळे पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. मागील तीन दिवसांपासून अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे नदीकाठील गावांचा संपर्क तुटला असून शेतपिके मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहेत. सध्या ईसापुर धरणाचे १३ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या संगम चिंचोली, मार्लेगाव, देवसरी, पळशी या गावांना सर्वाधिक धोका असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पळशी गाव जलमय
सोमवारी दुपारी पळशी गावाला पुराचा वेढा पडला असून सध्या पाणी वाढतच आहे. गावातील शाळेच्या आवारासह खोलगट भागातील १० ते १५ घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीतून नदीचे पाणी आणखी वाढण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाने तत्काळ गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान आज दुपारपासून जिल्ह्यात पावसाचे थैमान पुन्हा सुरू झाले. यवतमाळसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. आज मंगळवारी सकाळी काही भागात पावसाने उसंत घेतली. मात्र धरणातील पाणी नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने अनेक गावे अद्यापही पुराच्या छायेत आहेत.
शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू
एकीकडे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असताना नापिकीच्या भीतीने शेतकरी खचले आहेत. नापिकी, पिकांचे झालेले नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात २४ तासात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वणी तालुक्यात दोन तर आर्णी तालुक्यात एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. वणी तालुक्यातील सैदाबाद येथील शेतकरी राजकुमार मारोती गोवारदिपे (५५) यांची नवरगाव येथे शेतजमीन आहे. त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी तातडीने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.
दुसरी घटना कळमना (बु) ता. वणी येथे घडली. सहदेव विश्वनाथ बोबडे या शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. त्यांना वणी येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे कळमना (बु) येथे १.२९ हे. आर. जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे.
तिसऱ्या घटनेत आर्णी तालुक्यातील पळशी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. अरविंद सूर्यभान धूर्वे (२८) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. सततच्या पावसामुळे नापिकीची भीती आणि कर्जामुळे ते मागील काही महिन्यापासून विवंचनेत होते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.