HSRP Number Plate Last Date : राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याच्या मुदतीबाबत मोठी घडामोड झाली आहे. परिवहन खात्याने ही पाटी लावण्याला मुदतवाढ (HSRP Number Plate Last Date Extended) दिल्याने लक्षावधी वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोणत्या तारखेपर्यंत ही पाटी लावता येणार? याबाबत आपण जाणून घेऊ या.
राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याला आता चवथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत ही पाटी लावण्याची मुदत होती. त्यामुळे ७० टक्के वाहनांना पाटी लागली नसल्याने वाहनांवर कोणती कारवाई होणार? याकडे लक्ष लागले होते. आता नवीन घडामोडीमुळे वाहन धारकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात २० टक्केच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्यात आली असून १० टक्के वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी वेळ घेतली आहे. परंतु, ७० टक्के वाहनांना अद्याप ‘एचएसआरपी’ लागली नसल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते.
दरम्यान ‘एचएसआरपी’ लावण्यासाठी परिवहन खात्याने तीनदा मुदतवाढ दिली. १४ ऑगस्टला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही पाटी लावता येणार आहे. दरम्यान राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची दोन कोटी ५४ लाख ९० हजार १५९ जुनी वाहने आहेत. यातील केवळ ४९ लाख ८९ हजार ६५६ वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात आली. येत्या काही दिवसांत पैसे भरून वेळ घेतलेल्या १० टक्के वाहनांना आणखी ‘एचएसआरपी’ लागतील. परंतु १५ ऑगस्टपूर्वी शिल्लक ७० टक्के वाहनांना ‘एचएसआरपी’ कशी लागेल, हा खरा प्रश्न निर्माण झाला होता.
परिवहन आयुक्तांच्या बैठकीत चर्चा नाही
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पुण्यात ११ व १२ ऑगस्ट रोजी राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत फिटमेंट सेंटर वाढवणे, ‘एचएसआरपी’ बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि जनजागृतीवर भर देण्यात आला. परंतु, मुदत वाढीबाबत काहीच चर्चा झाली नव्हती. त्यामुळे या मुदतवाढीबाबत गुढ वाढले होते.
सिंधुदुर्ग, गडचिरोली पुढे
राज्यात वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात सिंधुदुर्ग (एमएच ०८) जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, तेथे ३३ टक्के वाहनांना ही पाटी बसवण्यात आली. त्यानंतर वर्धा (एमएच ३२), नागपूर ग्रामीण (एमएच ४०), सातारा (एमएच ११) आणि गडचिरोली (एमएच ३३) या आरटीओ कार्यालयांचा क्रमांक लागतो.
परिवहन आयुक्त काय म्हणाले होते?
“राज्यात १३ ऑक्टोंबरला परिवहन आयुक्त लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले होते की, राज्यात ३० टक्क्यांच्या जवळपास वाहनांना ‘एचएसआरपी’ (HSRP Number Plate Last Date Extended) लावण्यात आली आहे. १५ ऑगस्टला शेवटची मुदत असून त्यानंतर पाटी न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नवीन मुदतवाढीबाबत अद्याप शासनाकडून सूचना नाही. परंतु आता मुदतवाढ मिळाल्याने ही पाटी लावण्याचा तिढा सुटला आहे.