गोंदिया: हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३ वर मंगळवार २ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या रेल्वे स्थानकावर आग लागल्याचे कळताच त्यावेळी रेल्वे स्थानकावर आपल्या रेल्वे गाडीची वाट बघत उपस्थित असलेल्या प्रवाशात धावपळ सुरू झाली.
गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभे असलेल्या अपघात मदत वैद्यकीय वाहन बोगीला अचानक आग लागल्याचे कळताच संपूर्ण रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. आग तात्काळ विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले. लगेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीच्या घटनेमुळे हावडा मुंबई मार्गावर यावेळी मागेपुढे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
यात प्रामुख्याने बिलासपूर नागपूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला गोंदियापूर्वीच काही काळापर्यंत थांबविण्यात आले होते. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनल- मुंबई- शालिमार (हावडा) ज्ञानेश्वरी एक्सप्रेस या गाडीला पण गोंदिया पूर्वी येणाऱ्या गंगाधरी स्थानकावर एक तासाच्या थांबा गोंदिया स्थानकाकडून मिळालेल्या सुचनेनुसार देण्यात आलेला होता. प्रसंगी हावडा मुंबई रेल्वे मार्गावरिल गोंदिया स्थानक परिसरातील विद्युत वाहिनीचा पुरवठा काही काळापुरता खंडित करून काही तासाचा ब्लॉक घेण्यात आला.
या अचानक लागलेल्या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या मध्ये अपघात मदत वैद्यकीय वाहन बोगी पूर्ण पणे आत मधून जळाली आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत ची चौकशी करिता नागपूर येथील एक पथक चौकशी करिता येणार आहे
अग्निशमन वाहन अखेरपर्यंत पोहोचलेच नाही : मृत्युंजय राय
गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३वर अपघात मदत वैद्यकीय वाहन बोगीला आग लागल्याचे कळल्यानंतर गोंदिया रेल्वे स्थानकावरून गोंदिया नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कॉल करून गोंदिया रेल्वे स्थानकावर एक बोगीला आग लागलीची माहिती देण्यात आली. आम्ही रेल्वेस्थानकावर अग्निशमन प्रत्येकाची वाट बघत होतो दरम्यान आमच्या रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्याकडून पण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. यामुळे ही आग नियंत्रणात आली. पण गोंदिया नगरपालिकेचे अग्निशमन वाहन अखेरपर्यंत आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचलेच नाही. यासंदर्भात गोंदिया अग्निशमन विभागाचे अधिकारी नीरज काळे यांना कळविण्यात आले असल्याची माहिती गोंदिया रेल्वे स्टेशन मास्तर मृत्युंजय राय यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.