IMD Issues Heavy Rain Alert Update:नागपूर : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूरपर्यंत गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील दहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट दिला असून पुढील २४ तास धोक्याचे असल्याचे सांगितले आहे.
राजधानी मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत. नवी मुंबई, पनवेल रायगड परिसरात पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील दहा जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. पुढील २४ तास राज्यातील दहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा टर्फ लाइन तयार झाली आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातून येणारे वारे आहेत.
त्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे चार दिवस परिस्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. कोकण किनारपट्टीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तर विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा तर मराठवाड्यात जालना बीड आणि औरंगाबाद, घाटमाथ्यावर कोल्हापूर, सातारा मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि नगरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. तसेच, सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर तसेच छत्तीसगड भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. सोबतच बाष्पयुक्त वारे वाहत असल्यामुळे ३० ऑगस्टला सर्वदूर पावसाची शक्यता आहे. ३१ ऑगस्टपासून मात्र पावसाचे प्रमाण कमी होणार असून थोडी फार हवा राहणार आहे. पाऊस बंद झाल्याने मात्र ढगाळ वातावरण व आर्द्रता वाढल्याने दमट वातावरण राहणार आहे, त्यामुळे काही प्रमाणात उकाडा वाढू शकतो, असाही अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.