अकोला : भारतात हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. जगातील मनुष्याचे जीवन सुखी करण्याचे तत्व म्हणजे हिंदुत्व. ज्यांना हे कळले ते सर्वांना एकत्रित करतात. हिंदुत्वाचे तत्व एकत्रिकरणात आहे, असे मत रा.स्व.संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी येथे व्यक्त केले. अकोला महानगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्र पुजन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक शिवप्रकाश रुहाटिया, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल उपस्थित होते. शस्त्र पूजन करून योग, कवायतींचे स्वयंसेवकांनी सादरीकरण केले. सुनील आंबेडकर यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला.

राष्ट्रनिर्माणासाठी तरुणाई पुढे येत असून, समृद्ध, स्वयंपूर्ण आदर्श राष्ट्र कसे असते हे भारत दाखवून देत आहे. शताब्दी वर्षात समाज जोडण्याच्या कार्यात सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज दिसून येते. समाज विरोधी प्रवृत्तीचा नायनाट करणे आवश्यक आहे. राष्ट्रहिताची प्राथमिकता समोर ठेवून डॉ. हेडगेवार सक्रिय होते. त्यातून संघाची स्थापना झाली. क्रांतिकारी आंदोलनामध्ये डॉ. हेडगेवार यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यासाठी सर्व मार्गाने त्यांनी प्रयत्न केले. विदेशी सत्ता घालवून समाजातील परिस्थिती बदलली पाहिजे, ही त्यांची भावना होती. आज शताब्दी वर्षानंतर सकारात्मक परिवर्तन दिसून येत आहे, असे सुनील आंबेकर म्हणाले.

श्रीराम जन्मभूमीसाठी ५०० वर्षांचा लढा द्यावा लागला. अनेकांना आता खऱ्या हिंदुत्वाचा उलडगा होत आहे. हिंदुत्व हे एकसंघता शिकवते. ती जगण्याची संस्कृती आहे. मात्र, दुदैवाने अनेकांचा याचा विसर पडला. धर्म-पंथाच्या आधारे देशाचे विभाजन झाले. देशातील हिंदुत्व जीवन पद्धतीमुळे विविध धर्माला आसरा मिळाला. आगामी काळात अराजक माजवणाऱ्या शक्तींना रोखणे आवश्यक आहे. समाजाने आपले संघटित रुप सादर करणे आवश्यक असून, संघाकडून हिंदुंच्या संघटित शक्तीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जगावर पर्यावरणाचे संकट असून, यावर मात करण्यासाठी मंथन सुरू आहे. आर्थिक प्रगती करीत असतानाच देश स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेचे (एआय) युग आहे. मात्र एआय सुसंस्कार करू शकत नाही. संस्कृतीशी तडजोड होता कामा नये. आधुनिकता-प्रगती, संस्कृती व पर्यावरणाची योग्य सांगड असेल तरच खऱ्या अर्थाने आपण सुखी होऊ, असेही आंबेकर यांनी स्पष्ट केले. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत असून, या रोखण्यासाठी संघाने, संघाशी निगडीत संघटनांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शिवप्रकाश रुहाटिया यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात नरेंद्र देशपांडे यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह गणवेशात एक हजार ३२२ स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्मीरमध्ये परिवर्तनाचे सूर

देशात अनके ठिकाणी दशतवादी कारवाया होत असत. आता ते प्रकार होत नाहीत. आता काश्मीरमधून परिवर्तनाचे सूर ऐकू येत आहेत. ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘ऑपरेशन सिंदूर’मधून चोख प्रत्युत्तर दिले, असे सुनील आंबेकर म्हणाले. धर्मांतर रोखण्यासाठी संघाने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.